गोव्याच्या सीमा अन् बारही मंगळवारपासून खुले होणार

शिवप्रसाद देसाई
Monday, 31 August 2020

गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केली जाणार नाही.

सावंतवाडी : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार गोवाच्या सीमा मंगळवार (ता.1) पासून खुल्या केल्या जातील. बारही सुरु केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी रात्री पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली. गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोविड चाचणीची सक्ती केली जाणार नाही, असे ते म्हणाले. शाळा सुरु करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, सप्टेंबरनंतर त्याविषयी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, आरोग्य सचिव नीला मोहनन यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की कोविड इस्पितळातील खाटा भरल्या असून, फोंडा येथे कोविड रुग्ण पाठवणे आजपासून सुरु करण्यात आले आहे.

गणेशोत्सवामुळे नव्हे तर लोकांच्या बेशिस्तीमुळे रुग्ण वाढले असे मी नमूद केले होते. माझ्या विधानाचा विरोधी कॉंग्रेस विपर्यास करत आहे. मी त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसून केवळ वस्तुस्थितीवर बोट ठेवले आहे. जे सत्य आहे तेच मी बोललो आहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री गोवा  

गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्यांची गर्दी 
बांदा (जि. सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र-गोवा सीमेवरील गोवा पोलिसांच्या पत्रादेवी पोलिस तपासणी नाक्‍यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यासाठी सोमवारी सकाळपासून अचानक गर्दी झाली. सीमा खुली होणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर या रांगा लागल्या; मात्र गोवा पोलिसांनी अजूनपर्यंत आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितल्याने त्यांची निराशा झाली. 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व सीमा उद्यापासून (ता.1) खुल्या करण्यात येणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त पसरले होते. प्रत्यक्षात सायंकाळी पत्रकार परिषद व्हायची होती; मात्र सकाळपासूनच सीमेवर गर्दी सुरू झाली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाच महिने महाराष्ट्र-गोवा सीमा बंद आहे. सीमा खुली झाल्यास गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या शेकडो तरुणांचा प्रश्‍न मिटणार आहे. गोव्यात अडकलेल्यांना जिल्ह्यात येण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आज तपासणी नाक्‍यावर गोव्यातून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्यात येण्यासाठी गोवा नाक्‍यावर नोंदणी करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

नाक्‍यावरील पोलिस कर्मचाऱ्यांना सीमा खुली करण्याबाबत विचारणा केली असता अद्याप वरिष्ठ स्तरावरून आदेश आले नसल्याचे सांगितले. सीमेवरील जिल्हा पोलिस तपासणी नाक्‍यावरील कर्मचारीदेखील सीमा खुली होण्याबाबत अनभिज्ञ आहेत. आज मोठ्या संख्येने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची नोंदणी पत्रादेवी तपासणी नाक्‍यावर करण्यात आली.

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa border bar will be open from Tuesday