गोवा प्रवेशाचा ई-पास मिळेना 

goa government e pass problem
goa government e pass problem

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गोव्यात अनेक वर्षे काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील मुलांना गोव्यात तत्काळ कामावर सामावून घेण्याबाबतचे आश्‍वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आमदार तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे. यामुळे अडचणीत सापडलेल्या शेकडो तरूणांच्या आशा पल्लवीत झाल्या; मात्र यासाठी आवश्‍यक असलेला गोवा सरकारचा ई-पास उपलब्ध होत नसल्याने एक नवीन समस्या उभी राहिली आहे. 

"सिंधुदुर्गातील शेकडो तरूण अडचणीत', या शीर्षकाखाली "सकाळ'ने रविवारी (ता.24) गोव्यात कामाला असलेल्या सिंधुदुर्गातील तरूणांची व्यथा मांडली होती. अनेकांचे रोजगार जाण्याची भीती येथील तरूणांसह निर्माण झाली होती. यावर "सकाळ'ने प्रकाश टाकताना वस्तुस्थिती समोर आणल्याने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार केसरकर यांनी तत्काळ दखल घेत गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली. यावर गोव्यात राहण्याची सोय असलेल्यांना तत्काळ कामावर सामावून घेण्याबाबत प्रयत्न केले जातील तसेच सोयी नसलेल्यांबाबत 1 जूननंतर निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन सावंत यांनी दिले होते; मात्र यासाठी ई-पास असलेल्यांनाच गोव्यात प्रवेश मिळणार होता.

गोवा मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासनाने येथील शेकडो तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या; मात्र गोवा शासनाच्या वेब साईटवर ऑनलाईन ई-पाससाठी माहिती टाकल्यास दोन दिवसांनी "रिजेक्‍ट' असा मॅसेज येतो. जिल्ह्यातील अनेकांनी यासाठी प्रयत्न केले आहेत; मात्र त्यापैकी 99 टक्के तरूणांना अद्याप हा पास मिळालाच नाही. दुसरीकडे जर गोव्यातील व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडकली असल्यास त्याला गोवा सरकारकडून लगेच ई-पास उपलब्ध होतो. त्यामुळे यात गोवा सरकारकडून एकप्रकारे जिल्ह्यातील तरुणावर अन्याय होत असुन एक नवीन समस्या आता येथील तरुणासमोर उभी आहे. 

गोवा सरकारकडून दररोज नवनवीन नियमावली काढण्यात येत आहे. गोवा मुख्यमंत्री व आमदार केसरकर यांच्यातील चर्चेनंतर आज काही तरुणांनी गोव्यात जाण्यासाठी गोवा सीमेवर धाव घेतली; मात्र ई पास शिवाय व आयसीएमआर प्रमाणीत लॅबमधील कोविड निगेटिव्ह चाचणी असलेला रिपोर्ट असल्याशिवाय आपण कोणालाच सोडणार नाही, असे तेथील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास तेथे दोन हजार रुपये भरुन स्वॅब चाचणी करण्यात येणार आहे. एखाद्याकडे ही चाचणी करण्यास पैसे नसल्यास त्याला चौदा दिवस होम क्वांरटाईन करण्यात येणार आहे. स्वॅब चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला कामावर सामावुन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील तरुणांना गोव्यात जाण्यासाठी ई पास गरजेचा असुन तो तात्काळ उपलब्ध होण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

सिंधुदुर्गातील तरूणांना गोवा राज्यात जाण्याच्या अनुमतीसाठी गोवा शासनाची स्वतंत्र वेबसाईट आहे. त्यांना जिल्हा प्रशासनाची कुठल्याही प्रकारची ना हरकरत लागत नाही. त्यामुळे आजपर्यंत किती तरुणांना गोव्यात जाण्यासाठी ई-पास मिळाले ही माहीती आमच्याकडे उपलब्ध नाही. 
- सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी, सावंतवाडी. 

तीन वेळा उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पाससाठी गोवा सरकारच्या वेबसाईटवर अर्ज केला; मात्र गोव्याचा रहिवासी नसल्याचे कारण सांगून परवानगी नाकारण्यात आली. गोव्यात औषध पुरवठा करणाऱ्या संस्थेत काम करत असून ते काम अत्यावश्‍यक सेवेत येते. त्यामुळे कामावर जाणे गरजेचे आहे. गोवा सरकारचे नवेआदेश येतात; मात्र गोवा सीमेवर असणारे अधिकारी त्याबाबत जीआर नसल्याचे कारण सांगून प्रवेश देत नाहीत. या समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे. 
- मयूर मोहिते, सावंतवाडी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com