अंजली पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास सुवर्णपदक

अमित गवळे
सोमवार, 21 जानेवारी 2019

पाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या आविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले.

पाली - शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अंजली सुधीर पुराणिक यांच्या संशोधन प्रकल्पास प्रथम पारितोषिकसह सुवर्णपदक मिळाले आहे. गौंडवना विद्यापीठ गडचिरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या आविष्कार आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले.

महाराष्ट्रातील २० विद्यापीठातून ५८० स्पर्धक या महोत्सवात सहभागी झाले होते. अंजली पुराणीक यांना शिक्षक वर्गातून 'ए ग्रीन अॅप्रोच टू क्लिन इंटस्ट्रीअल इमिशन्स' या संशोधन प्रकल्पास हा पुरस्कार मिळाला. सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख पारितोषिक असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अंजली पुराणिक यांच्या यशाबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल, उपाध्यक्ष रविंद्र लिमये, मानद सचिव रविकांत घोसाळकर व महाविद्यालयातील सर्व सहकार्यांनी आणि विदयार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

माझ्या संशोधनास के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे डॉ. भानू रामन यांचे मार्गदर्शन मिळाले. मुंबई विद्यापिठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी माझ्या संशोधनावर विश्वास दाखविला. तसेच मुंबई विद्यापिठाचे आविष्कारचे विशेष अधिकारी डॉ. बर्वे, डॉ. मोमिन व डॉ. मिनाक्षी गुरव तसेच संघ व्यवस्थापक डॉ. बारापात्र व डॉ. भुषण वांगी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. प्राचार्य युवराज महाजन व सर्व सहकारी यांचे प्रोत्साह आणि कुटूंबियांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाले आहे.
- अंजली पुराणिक, पुरस्कारप्राप्त प्राध्यापिका.

पर्यावरण संवर्धन करणारा प्रकल्प
औद्योगिक प्रकल्पामध्ये धुलीकण, हरितवायू, आम्ल गुणधर्म असलेले वायू यांचा समावेश असतो. बहुतांश कंपन्यांमधून बाहेर सोडल्या जाणार्या वायूंमधून काही कण बाजूला केले जातात. परंतु, हरित वायू व आम्ल वायू मात्र मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जातात. यामुळे वैश्विक तापमानवाढीला हातभार लागतो. हे वायू त्यांच्या उगमस्थानीच थांबविण्यासाठी या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. यात एक नाविन्यपूर्ण मिश्रण तयार करण्यात आले व त्यामधून हे प्रदुषण निर्माण करणारे वायू पाठविले जातात. आणि तेथे अॅडसॉर्पशन प्रक्रियेच्या मदतीने हे वायू थांबविले जातात.

वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड वाढविण्यासाठी
विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी, संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी, भविष्याला पुरक ठरु शकणारे संशोधन करणार्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना प्रोत्साहित करणे, शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण विद्यार्थी व प्राध्यापक घडविणे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणे या विविध हेतूने सन २००७ – २००८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालिन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या आदेशानूसार 'आविष्कार' हा संशोधन महोत्सव सुरु झाला. या स्पर्धेचे विभागीय, विद्यापीठ व राज्यस्तर क्रमवार आयोजन करण्यात येते.
१.मानव्यशास्त्र, भाषा, कला
२. वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा
३. मूलभूत विज्ञान,
४. कृषी व पशुसंवर्धन
६. वैद्यकिय व औषधनिर्माण
या सहा प्रकारांमधून विविध पातळ्यांवर विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होत असतात. प्रत्येक विद्यापीठाचा ४८ जणांचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होत असतो. प्रत्येक प्रकारात चार वेगवेगळ्या गटांमधून प्रथम येणाऱ्या दोन स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व रोख पुरस्काराने गौरविण्यात येते.

Web Title: Gold medal for Anjali Puranik's research project