सोने पॉलीशच्या बहाण्याने शिरोड्यात फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

वेंगुर्ले - सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करून देतो असे सांगून दोन भामट्यांनी शिरोड्यात दोघा महिलांना लुटले. या भागात चोऱ्यांच्या घटना ताजे असतानाच पुन्हा घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज घडला.

वेंगुर्ले - सोन्याच्या दागिन्यांना पॉलीश करून देतो असे सांगून दोन भामट्यांनी शिरोड्यात दोघा महिलांना लुटले. या भागात चोऱ्यांच्या घटना ताजे असतानाच पुन्हा घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज घडला.

आरवली येथील वेतोबा मंदिरातील फंडपेटी चोरी व शिरोडा येथील मोबाईल शॉपी चोरी प्रकरण ताजे असतानाच आज तेथे पुन्हा फसवणुकीचा प्रकार घडला. शुद्ध मराठी बोलणारे दोघेजण आज गावात फिरत होते. ते आपण पावडरच्या साहाय्याने तांब्याची भांडी चकचकीत करून देतो असे सांगत घरोघरी फिरत आहेत. शेजारी- शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी प्रथम आपल्या तांब्याच्या भांड्यांची सफाई करून घेतली. त्या नंतर त्यांनी आपल्याकडील लिक्विडचा वापर करून सोन्याचे दागिनेही चकचकीत करून देतो असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून या महिलांनी सोन्याच्या बांगड्या व सोन्याची चेन त्यांच्याकडे सफाईसाठी दिली. त्या भामट्यांनी हे दागिने आपल्याकडील लिक्विड असलेल्या डब्यात घातले, आणि पाच मिनिटात ते साफ होतील असे सांगून पाच मिनिटांनी बाहेर काढले व ते दागिने हळदीच्या पुडीमध्ये ठेवायला सांगितले. आपले काम आटपून ते दोघे पॉलीशचे पैसे घेऊन तेथून पसार झाले. जाताना त्यांनी थोड्या वेळाने तुम्ही जेव्हा ते दागिने हळदीमधून काढाल तेव्हा चकचकीत झालेले असतील असे सांगितले.

दरम्यान काही वेळानी या दोघीनी ते दागिने हळदीमधून काढले असता त्यांचे वजन त्यांना कमी वाटू लागले. घाबरलेल्या या दोघीनी तात्काळ सोनाराकडे जाऊन दागिन्यांचे वजन केले असता वजनामध्ये मोठी घट झाली असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. या भामट्यांच्या कारनाम्याबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे. पोलिसांनीही अशा व्यक्तींपासून सावध रहा असे आवाहन केले आहे. तसेच असे लोक आढळ्यास त्वरित पोलिसांना संपर्क करावा, असेही जाहीर करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold polishing Cheating case in Shiroda