गोवळकोट खाडीकिनारी स्थलांतरित पाहुण्यांचा विहार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

विदेशी पाहुण्यांचे आगमन; ससाण्याचेही दर्शन

चिपळूण - निसर्गसंपन्न गोवळकोट खाडीकिनारी हजारो पक्षी स्थलांतर करून येत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात या भागात विदेशी पक्ष्यांची जणू शाळा भरत असल्याचे चित्र आहे. येथील स्थानिक नागरिकही पक्षीदर्शनासाठी गोवळकोट खाडीकडे वळत आहेत.

विदेशी पाहुण्यांचे आगमन; ससाण्याचेही दर्शन

चिपळूण - निसर्गसंपन्न गोवळकोट खाडीकिनारी हजारो पक्षी स्थलांतर करून येत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात या भागात विदेशी पक्ष्यांची जणू शाळा भरत असल्याचे चित्र आहे. येथील स्थानिक नागरिकही पक्षीदर्शनासाठी गोवळकोट खाडीकडे वळत आहेत.

गोवळकोटपासून पुढे दाभोळपर्यंत विस्तारलेल्या खाडी किनारी दरवर्षी कडक थंडीमुळे हजारो पक्षी येतात. हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करून येणाऱ्या या पक्ष्यांमुळे खाडीकिनारे गजबजले आहेत. स्थानिक पक्षी निरीक्षक अनिकेत कासेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्‍टोबरपासून या भागात स्थलांतरित पक्षी येतात. त्यामध्ये लाल सरी, बदक, कलहंस बदक, ढबवा, पिटेल, लिटल ग्रेब, पायपर (छोटी तुतवार), लिटिल स्टिंट, कोम्बच डक, ग्रीन बी इटर, गुज, लेसर विलसिंग डक, कॉमन डिले, राखीव बगळा आदींचा समावेश आहे. ससाणा हा विदेशी पक्षी केवळ याच भागात पाहायला मिळतो. दिवाळीनंतर अनेक खाडीभागात रंगबेरंगी स्थलांतरित पक्ष्यांची किलबिलाट सुरू होतो. निसर्ग संतुलनात हे पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पक्षी पाणी, हवा व वनस्पतीवरील असंख्य कीटक खातात. त्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होते. उत्तम बीजप्रसारक व शेतकऱ्यांचे मित्र ही भूमिका ते निभावतात. मानवी हस्तक्षेप नसलेल्या खाडीकिनारी हे पक्षी राहतात. 

निरनिराळ्या प्रकारची फुलपाखरे तसेच मगरींचे दर्शनही होते. जलक्रीडा करणाऱ्या विदेशी पक्ष्यांचा थवाही पाहायला मिळतो. बोट जवळ गेल्यावर हे पक्षी एकाचवेळी उडतात तो क्षण नेत्रदीपक असतो. मानवी हस्तक्षेपामुळे या पक्ष्यांची घरटी नष्ट होतात.

ग्लोबल टुरिझमचा प्रयत्न
येथील ग्लोबल टुरिझम संस्थेतर्फे कालुस्ते येथील जुवाड बेट विकसित करण्याचे काम सुरू आहे. गोवळकोट धक्‍क्‍यापासून पुढे कालुस्ते, चिवेली, गांग्रई, मालदोली, भिले आदी भागात खाडीचे दर्शन घडविले जाते. तेथे नौकाविहारही करता येतो. गोवळकोट परिसराला केरळसारखे निसर्ग सौंदर्य लाभले आहे.

जलक्षेत्रांचे बदलणारे स्वरूप व नवीन जलाशयांची निर्मिती, खाद्याची उपलब्धता यावर पक्ष्यांचे स्थलांतर अवलंबून असते. नैसर्गिक अधिवासात वाढता हस्तक्षेप आणि शिकार यामुळे कमी होणारी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या रोखणे गरजेचे आहे. 
 - महेंद्र कासेकर, गोवळकोट

Web Title: Govalakota creek borders to immigrants visitors