कुडाळात शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ 

अजय सावंत
Thursday, 21 January 2021

भविष्यात आगामी सर्वच निवडणुकासाठी आजचा झालेला विजय हा शिवसेनेला आत्मपरीक्षण करणारा निश्‍चितच आहे. 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील 9 ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागल्यानंतर भाजपने मिळविलेल्या यशाबाबत शिवसेनेला निश्‍चितच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती लागला. निकालाचे चित्र पाहता शिवसेनेला पाच जागांवर समाधान मानावे लागले. हा त्यांचा मोठा विजय नाही, असे म्हणावे लागेल. भविष्यात आगामी सर्वच निवडणुकासाठी आजचा झालेला विजय हा शिवसेनेला आत्मपरीक्षण करणारा निश्‍चितच आहे. 

गेल्या काही वर्षांपासून कुडाळ तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा, आजही ओळखला जातो; पण या निकालावरून अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर शिवसेनेला आतापासूनच मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्‍यात पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेची मुसंडी आहे.

यावर नियंत्रण नसल्यास राजकीय धोके अनेक आहेत. या धोक्‍याबाबत जागरूक न राहिल्यास आगामी कुडाळ नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत खडतर मेहनत घ्यावी लागणार. तालुक्‍यात भारतीय जनता पार्टी पक्ष चांगल्या प्रकारे डोके वर काढत आहे. त्यांनी नऊपैकी पाच जागांवर मिळविलेले यश निश्‍चितच शिवसेनेला भविष्यातील निवडणुकींना डोईजड होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी आहे.

आगामी निवडणुका स्थानिकसह जिल्हा बॅंक निवडणुका या महाविकास आघाडी म्हणूनच लढल्या जाणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूक जरी शिवसेना-भाजपा अशा लढविल्या असल्या तरी महाविकास आघाडी चित्र असल्याचे दिसत होते का? हा सुध्दा प्रश्‍न आहे. खरोखरच महाविकासआघाडी रिंगणात उतरली असती तर हे चित्र निश्‍चितच बदलले असते का? हा सुध्दा प्रश्‍न आहे. सव्वा वर्षांपूर्वी शिवसेना व भारतीय जनता पार्टी युती म्हणून कार्यरत असताना भाजपचे अस्तित्व दिसून येत नव्हते.

शिवसेनेपेक्षा कमी जागा लढवत होत्या. आता स्वतंत्रपणे लढत असताना त्यांनी आपली ताकद शिवसेनेला दाखवून दिली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण नऊही ग्रामपंचायतीच्या या निवडणुका दोन्ही पक्षांने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या; मात्र शिवसेनेला या निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळाले नाही, हे तेवढेच सत्य आहे. ग्रामीण भागात निवडणुकीचे चित्र पाहता भारतीय जनता पार्टी हे त्यांना सरस ठरली आहे. भविष्यात येणारी कुडाळ नगरपंचायत म्हणा अथवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक म्हणा या सर्व निवडणुका ताकतीने जिंकण्यासाठी शिवसेनेला पुन्हा एकदा जोमाने काम करावे लागणार हे सत्य आहे. 

गिरगाव-कुसगावात शिवसेना 
गिरगाव-कुसगाव व वसोली निवडणुकीत शिवसेनेचे सर्व 7 पैकी 7 सदस्य निवडून आले. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विरोधकांना क्‍लीन स्वीप दिली आहे. गिरगाव-कुसगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, उपविभाग प्रमुख नरेंद्र राणे यांच्या यशस्वी रणनीतीमुळे प्रभाग 1 मधून भरत घाडी, स्नेहा सावंत, सुरेखा घाडी. प्रभाग 2 मधून प्रगती चव्हाटेकर, संतोष सावंत. प्रभाग 3 मधून शशिकांत आचरेकर, प्रतिभा गुरव हे शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. 

वसोलीत रणनीती यशस्वी 
वसोली ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समिती सदस्या श्रेया परब, सुधीर राऊळ यांच्या यशस्वी रणनीतीमुळे शिवसेनेचे सर्व 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. 20 वर्षे राणे समर्थकांची सत्ता असलेली ही वसोली ग्रामपंचायत शिवसेनेने यावेळी खेचून आणली आहे. प्रभाग 1 मधून निवास कारीवडेकर, मीनाक्षी राऊळ. प्रभाग 2 मधून सदानंद गवस, प्रियांका परब, सुरेखा डांगी. प्रभाग 3 मधून अजित परब व दीक्षा तवटे हे शिवसेना उमेदवार विजयी झाले आहेत. 

आत्मपरीक्षणाची वेळ 
माणगाव खोऱ्यातील वाडोस ग्रामपंचायत मागच्या वेळी शिवसेनेच्या ताब्यात होती; पण काठावर होती. आता भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तेच यश गोठोस ग्रामपंचायतीमध्ये मिळविले आहे. एकूणच हा निकाल शिवसेनेला आत्मपरीक्षण करणारा म्हणावा लागेल.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election kudal taluka konkan sindhudurg