शिवसेना-भाजपमधील संघर्षामुळे लढती लक्षवेधी 

एकनाथ पवार | Tuesday, 29 December 2020

शिवसेना आणि भाजपची अभेद्य युती गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटली. याच कालावधीत सिंधुदुर्गच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे प्रभाव असलेल्या खासदार राणे यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण राजकीय समीकरणेच पूर्णतः बदलून गेली आहेत.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - शिवसेना-भाजपची तुटलेली युती, खासदार नारायण राणेंचा भाजपप्रवेश आणि त्यामुळे बदललेली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे यामुळे जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लक्षवेधी ठरण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना आमने सामने येणार हे आता उघड असून महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाची भूमिकाही या निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. 

शिवसेना आणि भाजपची अभेद्य युती गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटली. याच कालावधीत सिंधुदुर्गच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे प्रभाव असलेल्या खासदार राणे यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण राजकीय समीकरणेच पूर्णतः बदलून गेली आहेत. या राजकीय बदलानंतर विधानसभा निवडणुका झाल्या; परंतु एखादा दुसरा अपवाद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे 15 जानेवारीला होत असलेल्या जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल भविष्यातील राजकीय प्राबल्याची दिशा निश्‍चित करणारे ठरणार आहेत. त्यामुळे या निवडणुका भाजप, शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांसह तालुक्‍यातील विविध पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वर्ष-दीड वर्षापूर्वीची राजकीय स्थिती फार वेगळी होती.

भाजपच्या तुलनेत जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेना प्रभावी होती; परंतु खासदार राणेंच्या रूपाने जिल्ह्यात भाजपाला तगडे नेतृत्व मिळाले आहे. राणेंसोबत त्यांचे हजारो कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत अनेक निवडणुकांचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा भाजपाकडे आहे. त्यातच गेल्या काही वर्षांत भाजपनेही चांगला जम बसविला होता. त्यामुळे एकुणच भाजपची संपुर्ण जिल्ह्यात संघटनात्मक ताकद फार मोठी आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अजूनही खासदार राणेंना मानणारा मोठा वर्ग आहे. 

Advertising
Advertising

जिल्ह्यातील खासदार, दोन आमदार शिवसेनेकडे आहेत; परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचेच वर्चस्व अधिक आहे. काही भागात शिवसेनेने चांगला जम बसविला आहे. त्यातच राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अलीकडेच शिवसेनेने सदस्य नोंदणीवर भर दिला होता. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आता जिल्ह्यात प्रथमच 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने येणार हे निश्‍चित आहे. पक्षाच्या चिन्हावर ही निवडणुक होत नसली तरी प्रत्येक ग्रामपंचायतीत पक्षीय पातळीवरच निवडणुका होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. गावागावात पॅनेलच्या माध्यमातून निवडणुक जातील, अशी चिन्हे आहेत.

देवगड तालुक्‍यातील 23 तर वैभववाडीतील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत तर उर्वरित 34 ग्रामपंचायती इतर तालुक्‍यातील आहेत. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर प्रथमच होत असलेल्या निवडणुकीवर भविष्यात ग्रामीण मतदारांवर कुणाचा प्रभाव आहे हे स्पष्ट होणार आहे. याशिवाय भविष्यातील राजकीय प्राबल्याची दिशा देखील स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच शिवसेना भाजपाने एकमेकांविरूध्द रणशिंग फुंकले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या पक्षाची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. अनेक प्रभागांमध्ये जरी त्यांची मोजकी मते असली सद्यस्थितीत तीच महत्वाची ठरणार आहे. 

प्रभारी आणि निरीक्षक 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षानी गांभीर्याने घेतल्या आहे. ग्रामपंचायत निवडणुक जिंकण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामपंचायत जिंकण्यासाठी गावनिहाय प्रभारी, निरीक्षक नेमण्यात आलेले आहेत. त्यांच्यावरच निवडणुकीची रणनिती ठरविण्याची जबाबदारी दिली आहे. 

जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष 70 ग्रामपंचायत निवडणूक लढविणार नाही तर ज्याठिकाणी पक्षाची ताकद आहे तेथील कार्यकर्त्याची इच्छा असेल तर निवडणूक लढविली जाणार आहे. जो पक्ष सदस्य असेल त्यालाच रिंगणात उतरविण्यात येईल. यासंदर्भातील चित्र 30 तारखेनंतर स्पष्ट होईल. 
- अमित सामंत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष,सिंधुदुर्ग. 

जिल्ह्यातील 70ही ग्रामपंचायत निवडणुकीचे नियोजन झाले आहे. पक्षाचे लोकाभिमुख धोरण, केंद्रपातळीवरून होत असलेली विधायक कामे आणि त्यामुळे जनतेचा पक्षाला मिळत असलेला वाढता पाठिंबा यामुळे जिल्ह्यातील 70ही ग्रामपंचायतीमध्ये भाजप विजयी होईल. 
- राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप सिंधुदुर्ग. 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या ताब्यात अधिकाधिक ग्रामपंचायती याव्यात असा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कॉंग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. अपवादात्मक स्थितीत मैत्रीपूर्ण लढतीही होतील. 
- बाळा गावडे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस सिंधुदुर्ग. 

कोरोना कालावधीतही सरकारने राज्यात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम दिसेल. या निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरेल. महाविकास आघाडीचे प्राबल्य निवडणुक निकालानंतर दिसून येईल. 
- सतीश सावंत, शिवसेना नेते, सिंधुदुर्ग. 

जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीच्या निवडणुका मनसे लढविणार असून या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना चांगला पर्याय दिला आहे. या निवडणुकीमध्ये पक्षाला चांगले यश मिळेल. 
- परशुराम उपरकर, नेते, मनसे. 

संपादन- राहुल पाटील