Gram Panchayat Result : नावडीत राष्ट्रवादीची बाजी; पाचांबे प्रथमच भाजपकडे

Gram Panchayat Result NCP In Navdi And BJP in Pachambe
Gram Panchayat Result NCP In Navdi And BJP in Pachambe

देवरूख ( रत्नागिरी ) - संगमेश्‍वर तालुक्‍यात आज 62 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये 5 ते 6 ग्रामपंचायतींकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यामध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या. यात तीन ठिकाणी सेनेला फटका बसला, तर उर्वरित ठिकाणी सेनेला यश आले. मात्र यातून शिवसेना विरुद्ध शिवसेना असा जंगी सामना पाहायला मिळाला. नावडीमध्ये सेना, भाजपच्या लढाईत राष्ट्रवादीने बाजी मारली. 

तालुक्‍यातील लोवले ग्रामपंचायत प्रतिष्ठेची ठरली. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली. माजी सरपंच आणि सेनेचे उपतालुकाप्रमुख बावा चव्हाण यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देत शिवसेनेचे संजय शिंदे यांनी पॅनेल उभे केले होते. शिवसेनेनेही शिंदे यांच्या पॅनेललाच जाहीर पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी चव्हाण हे पत्नीसह दोन ठिकाणी उभे होते. मात्र याठिकाणी संजय शिंदे यांच्या पॅनेलने चव्हाण यांच्या पॅनेलचा सुपडा साफ करत सर्व जागा जिंकल्या आहेत. 

नावडी ग्रामपंचायत शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मागील पाच वर्षे इथे सेनेची सत्ता होती. आजच्या निकालात या दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीचा झेंडा इथे फडकला आहे. तालुकाध्यक्ष विवेक शेरे हे सपत्नीक विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेची सत्ता हिसकावून घेतली आहे. साडवली ही सर्वात मोठी महसुली ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याकडे राखण्यात शिवसेनेला यश आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी ही लढाई प्रतिष्ठेची केली होती. मात्र इथे सहयाद्री विकास पॅनेलला भाजपने जाहीर साथ देत महाविकास आघाडीसमोर कडवे आव्हान उभे केले. यात भाजपचा एक व अन्य एक असे दोन सदस्य निवडून आले. कोसुंब ग्रामपंचायतही शिवसेनेने राखली असून इथे राष्ट्रवादीचा पराभव झाला. 

कासारकोळवण ही हक्‍काची ग्रामपंचायत शिवसेनेने गमावली आहे. मारळ ग्रामपंचायतीतही अशीच स्थिती झाली आहे. कडवई ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला बंडखोरांनी आव्हान दिले होते. ते बंडखोर निवडून आले. मात्र सेनेने इथे वर्चस्व राखले. पाचांबे ग्रामपंचायतीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला आहे. इथे शिवसेनेला सत्ता गमवावी लागली. कुरधुंडा ग्रामपंचायतीच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. इथे शिवसेना विरुद्ध भाजप राष्ट्रवादी एकत्र होती. मात्र सेनेने इथे यश मिळवले.

खाडीभागातील प्रतिष्ठेची डिंगणी ग्रामपंचायत आणि मार्लेश्‍वर मार्गावरील प्रतिष्ठेची हातीव ग्रामपंचायत एकमार्गी ताब्यात घेण्यात भाजपला यश आले आहे. साखरपा विभागात मात्र शिवसेनेचा वारू रोखणे कुणाला जमलेले नाही. उत्तर संगमेश्‍वरातही शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी झाली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com