नव्या आदेशामुळे ग्रामसभा मार्चपर्यंत स्थगित

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून अद्याप या सरपंचांची निवड झालेली नाही. मुदत संपलेल्या बऱ्याच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले आहेत.

रत्नागिरी -  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेवरील स्थगिती राज्याच्या ग्रामविकास विभागाने उठवली होती. हा आदेश सर्व ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचतो ना पोहाचतो तोच पुन्हा 20 जानेवारीला नव्याने आदेश काढून 31 मार्चपर्यंत ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभांना स्थगिती दिली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभा घेण्यास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली होती. शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकात कोविडच्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून पूर्वीप्रमाणे ग्रामसभा घेण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले.

26 जानेवारीला ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने 15 जानेवारीला काढला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेने ग्रामसभेची कार्यवाही करण्याचा आदेशपंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना बजावला होता. हा आदेश ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांपर्यंत पोहोचतो ना पोहोचतो तोच पुन्हा राज्याच्या ग्रामविकास विभागाने 20 जानेवारीला नव्याने आदेश काढला. जिल्ह्यातील ग्रामपंचायीत होणाऱ्या ग्रामसभेला 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. 

स्थगित करण्याचे "हे' कारण 
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून अद्याप या सरपंचांची निवड झालेली नाही. मुदत संपलेल्या बऱ्याच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले आहेत. यापैकी बऱ्याच प्रशासकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविलेला आहे. त्यामुळे या प्रशासकास एकाचवेळी एका पेक्षा अधिक ठिकाणी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भुषवणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे ग्रामसभा घेणे परिणामकारक ठरणार नाही. तसेच अद्यापही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून काही प्रमाणात कोरोनाचे सावट कायम आहे. या बाबी विचारात घेता ग्रामसभांना 31 मार्चपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Sabha adjourned till March due to new order