ग्राम सडक योजनेवरुन शेकाप आणि भाजपची जुंपली

अमित गवळे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

पाली(रायगड) - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुधागड तालुक्यातील रस्त्यांची कामे आम्हीच केली असून, विकासाचे श्रेय हे शेकापचेच आहे. याबाबत भाजपचे अज्ञान समोर आले असल्याचे शेकापचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी म्हटले आहे. 

पाली(रायगड) - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुधागड तालुक्यातील रस्त्यांची कामे आम्हीच केली असून, विकासाचे श्रेय हे शेकापचेच आहे. याबाबत भाजपचे अज्ञान समोर आले असल्याचे शेकापचे जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी म्हटले आहे. 

रस्त्यांच्या कामांच्या मंजुरीत शेकाप व भाजप या दोन राजकीय पक्षात काही दिवसांपासून श्रेय युद्ध सुरु झाले आहे. शेकाप आमदार धैर्यशिल पाटील यांनी मंजुर झालेल्या रस्त्यांचे नुकतेच सर्वेक्षण केले होते. यावर सुधागड तालुका भाजप अध्यक्ष राजेश मपारा यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांनी रस्त्यांची कामे आम्हीच केली असुन, शेकाप फूकटचे श्रेय लाटत आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि शेकापची भुमिका स्पष्ट करण्याकरीता शेकाप नेते व जि.प सदस्य सुरेश खैरे यांनी सोमवारी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाली शाखेत पत्रकार परीषद घेतली. 

दरम्यान, खैरे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांना आ. धैर्यशिल पाटील यांच्या प्रयत्नानेच मंजूरी मिळाली असल्याचे स्पष्ट केले. या रस्त्यांच्या कामाच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र दाखवून भाजप पदाधिकार्‍यांना मंजुरी झालेल्या रस्त्यांच्या कामाच्या निधीची माहिती देता येईल का?असा सवाल केला. भाजपला रस्त्यांच्या कामांचे सर्वेक्षण केल्यानंतर जाग आली. तो पर्यंत यांना माहितच नव्हते की अशा प्रकारची कामे झाली आहेत. 

याशिवाय कामांबाबत भाजप नेत्यांच्या महितीतही एकवाक्यता नसल्याचा आरोप खैरे यांनी केला.

शेकापने रस्ते, पाणी व समाज मंदिरात विकास अडकविला असेल तर ते खरे आहे. कारण या महत्वाच्या बाबिंशिवाय आणखी काय विकास असतो ते भाजपने सांगावे असे खैरे म्हणाले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना हे योजनेचे नाव असले तरी या योजनेत उपलब्ध होणारा निधी राज्य शासनाचा आहे. योजनेची केवळ नावे बदलली म्हणजे हा निधी मुख्यमंत्र्यांचा अथवा भाजपचा होत नाही. असे खैरे म्हणाले.  

यावेळी जि.प सदस्य सुरेश खैरे, पाली ग्रामपंचायत सरपंचसरपंच जनार्दन जोशी, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरिफ मनियार, संजोग शेठ, सुधीर साखरले, गजानन शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

शेकापचा दावा
सन 2017-18 व 2018-19 या वर्षासाठी सुधागड तालुक्यातील राज्य महामार्ग 94 ते झाप आपटवणे, भावशेत ठाकूरवाडी, राज्य महामार्ग 93 ते कान्हीवली, वांद्रोशी, भैरव फाटा ते कुंभारघर रस्ता आदी रस्त्यांच्या कामांना अंतीम मंजूरी देण्यात आली आहे. व सदर रस्त्यांना ५ जानेवारी २०१८ ला प्रशासकिय मंजूरीचे पत्र देखील प्राप्त झाले आहे. स्थानिक आमदारांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते सुचिवण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार आ. पाटील यांनी सदर रस्ते सुचवून मंजूरी घेतल्याची माहिती खैरे यांनी दिली. बुधवारी(ता.10) मंजुरी देण्यात आलेल्या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करुन तांत्रीक अडचणी समजून घेवून दर्जेदार रस्ते बनविण्याच्या दृष्टीने आ.धैर्यशिल पाटील यांनी सबंधीत अधिकार्‍यांना महत्वपुर्ण सुचना दिल्या. कोणत्याही रस्त्याच्या भुमीपुजनाचा नारळ फोडला नाही तरी देखील शेकापने भुमीपुजनाचा किंवा उद्घाटनाचा नारळ फोडल्याचा कांगावा भाजपने केलेला आहे. साधारणतः मार्चमध्ये निविदा प्रक्रीया पुर्ण होवून एप्रीलमध्ये प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामास सुरवात होणार असल्याची माहिती खैरे यांनी दिली.

Web Title: gram sadak yojana shekap BJP