सुधागड - बनावट स्वाक्षरीप्रकरणी ग्रामसेवक निलंबित

अमित गवळे
शनिवार, 30 जून 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासिक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचांची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर (रा. करंजघर विठ्ठलवाडी) यांनी केला होता. याप्रकरणी सखोल तपास व चौकशीअंती तत्कालीन ग्रामसेवक सुरेश वसंत चौकर यांना दोषी ठरवित शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबित केले असल्याचे लेखी आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले आहेत. 

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील खवली ग्रामपंचायतीत झालेल्या मासिक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचांची खोटी सही केल्याचा आरोप गजानन वाडेकर (रा. करंजघर विठ्ठलवाडी) यांनी केला होता. याप्रकरणी सखोल तपास व चौकशीअंती तत्कालीन ग्रामसेवक सुरेश वसंत चौकर यांना दोषी ठरवित शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबित केले असल्याचे लेखी आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिले आहेत. 

ग्रामपंचायत खवली येथे सन 2014-15 व सन 2015-16 मध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणुक नियम 1967 चे कलम 3 चा भंग करणे या कारणान्वये ग्रामसेवक चौकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पत्रात नमुद केले आहे. 

जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी दिलेल्या आदेशान्वये सुरेश वसंत चौकर तत्कालीन ग्रामसेवक खवली ता. सुधागड (सध्या कार्यरत पंचायत समिती कर्जत) यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्याअर्थी निम्म स्वक्षरीत व्यक्ती, महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल)नियम 1964 चे नियम 3(1)अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन याद्वारे ग्रामसेवक सुरेश चौकर यांना तत्काळ निलंबीत करण्यात आले असल्याचे नमुद केले आहे. याबरोबरच सदर आदेश आमलात असेल तेवढ्या कालावधीत ग्रामसेवक चौकर यांचे मुख्यालय पंचायत समिती अलिबाग येथे राहिल. गटविकास अधिकारी अलिबाग यांच्या पुर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ग्रामसेवक चौकर हे अर्धवेतनी रजेवर गेले असते तर त्यांना जेवढे रजा वेतन मिळाले असते त्या रजा वेतनाइतके निर्वाह भत्त्याची रक्कम आणि त्या व्यतिरिक्त त्यांना अशा रजा वेतनावर आधारलेला महागाई भत्ता सदर निलंबन झाल्याच्या दिनांकापासून या बाबतीत कार्यालयाचे पुढिल आदेश होईपर्यंत देय असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

ग्रामसेवक सुरेश चौकर यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी लवकरात लवकर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात यावा अशी मागणी गजानन वाडेकर यांनी केली आहे. 

गजानन वाडेकर यांनी सलग तीन वर्षापासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. तसेच वाडेकर यांनी कोकण विभाग नवी मुंबई आयुक्त यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार उपआयुक्त गणेश चौधरी( कोकण विभाग नवी मुंबई) यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खवली ग्रामपंचायतीत दि. 24-03-2015 रोजी झालेल्या मासिक सभेच्या इतिवृत्तात तत्कालीन ग्रामसेवकाने तत्कालीन सरपंचाची खोटी सही केली असल्याच्या वाडेकर यांच्या तक्रारीची सखोल चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतू स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून कारवाईस दिरंगाई व विलंब झाला असल्याची नाराजी वाडेकर यांनी या निकालावर प्रतिक्रीया देताना व्यक्त केली.

बनावट स्वाक्षरी प्रकरणी सबंधीत ग्रामसेवकावर कारवाई व्हावी या मागणीकरीता गजानन वाडेकर यांनी 21 मार्च 2016, 06 नोहेंबर 2017 तसेच 5 मार्च 2018 रोजी पाली सुधागड पंचायत समितीसमोर उपोषण केले होते. यावर पाली सुधागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी वाडेकर यांच्या तक्रारी अर्जाप्रकरणी सदर स्वाक्षरीची सत्यता पडताळणीसाठी मुख्य शासकीय दस्तऐंवज परिक्षक गुन्हे अन्वेषन विभाग पाषाण पुणे यांच्याकडे कार्यालयाचे पत्र सादर करण्यात आले होते. त्यानुसार उपलब्द झालेल्या अहवालानुसार जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी सबंधीत ग्रामसेवक चौकर यांना निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: gramsevak suspended for fake signature in sudhagad