ग्रॅव्हिटी पाणी योजना चिपळूण तालुक्‍याला वरदान

ग्रॅव्हिटी पाणी योजना चिपळूण तालुक्‍याला वरदान

चिपळूण - कोयनेचे वाशिष्ठी नदीला येणारे पाणी बंद झाल्यास पालिकेची ग्रॅव्हिटीची पाणी योजना तालुक्‍यासाठी वरदान ठरणार आहे. ९०० एमएमच्या पाईपने शहरात पाणी आणल्यास चिपळूण शहर आणि आजूबाजूच्या गावांनाही पाणी देता येईल. भविष्याचा विचार करता पालिकेने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

कोयना प्रकल्पात वीजनिर्मितीनंतरचे पाणी वाशिष्ठी नदीला सोडले जाते. हे पाणी उचलून चिपळूण पालिका शहरातील नागरिकांची तहान भागवते. उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून ग्रॅव्हिटीने शहरात पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुमारे शंभर कोटीची ही योजना झाल्यास शहराच्या उंच भागापर्यंत पाणी जाणार आहे. कोळकेवाडी धरणातून ७०० एमएमच्या पाईपने पाणी आणण्याचा पालिकेचा 
प्रस्ताव आहे.

कोयना धरणातील पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या राज्य शासनाच्या उच्चस्तरीय कमिटीने नुकतीच कोयनेला भेट दिली. धरणातील पाण्याचा वीज निर्मितीसाठी पुनर्वापर करण्याचे ठरले, तर वाशिष्ठी नदीला येणारे पाणी बंद होईल. या पाण्यावर अवलंबून असलेल्या योजना बंद पडण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत चिपळूणची ग्रॅव्हिटी योजना संपूर्ण तालुक्‍यासाठी वरदान ठरण्याची शक्‍यता आहे.

पालिकेला कर भरावा लागेल
कोळकेवाडी धरणातील पाणी थेट पाईपलाईनने चिपळूणपर्यंत आणले जाणार आहे. त्यामुळे कोळकेवाडी ते चिपळूण दरम्यानच्या गावांना या योजनेतून पाणी देता येईल. ७०० ऐवजी ९०० एमएमच्या पाईपने पाणी आणल्यास सावर्डेपर्यंत हे पाणी नेता येईल. संपूर्ण तालुका टॅंकरमुक्त करता येईल. धरणातून उचललेल्या पाण्याचा पालिकेला कर भरावा लागेल. शहराची तहान भागवून राहिलेले पाणी ग्रामपंचायतींना विकून पालिकेला उत्पन्न घेता येईल. 

आठ कोटींचा खर्च वाढणार 
ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेचे बजेट १०० कोटीपर्यंत आहे. ७०० च्या ऐवजी ९०० एमएमच्या पाईपचा वापर केल्यास आठ कोटींचा खर्च वाढेेल. 

संपूर्ण तालुक्‍याला टंचाईतून मुक्त करण्यासाठी ९०० एमएम पाईप टाकण्याचा विचार सुरू आहे. ‘एमजीपी’कडे त्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. 
- सुरेखा खेराडे,
नगराध्यक्ष, चिपळूण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com