ज्यांचे संसार उघड्यावर पडलेत त्यांचे संसार सावरायचेत पण

Guardian Minister Adv. Anil Parab press conference ratnagiri
Guardian Minister Adv. Anil Parab press conference ratnagiri

रत्नागिरी: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे ११ हजार हेक्‍टरचे नुकसान झाले. त्यासाठी ८ कोटी ५० लाखांची नुकसानभरपाई प्राप्त झाली आहे. ते पैसे नुकसानग्रस्तांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहेत. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ३० कोटींचा जादा निधी आला आहे. शासनाला तो परत जाणार आहे; मात्र ज्यांचे संसार उघड्यावर पडलेत, त्यांना भांडीकुंडी आदींसाठी १० कोटींची गरज आहे. या निधीतील १० कोटी यासाठी खर्च करता येऊ शकतात. परंतु, ते कोणत्या हेडखाली खर्च करावेत, याविषयी मार्गदर्शन वित्त विभागाकडे मागितले आहे, त्यांच्या सूचना, परवानगीनुसारच हा निधी खर्च होईल, अशी माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.


जिल्ह्याची आढावा बैठक आज पालकमंत्री परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम आदी उपस्थित होते. पालकमंत्री परब म्हणाले, ‘‘निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषयांचा आज आढावा घेतला. यामध्ये निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोली तालुक्‍याचे मोठे नुकसान झाले. भरपाई म्हणून शासनाकडून ३० कोटींचा जादा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी शासनाला परत जाणार आहे.

या दोन्ही तालुक्‍यांत झालेल्या पंचनाम्यामध्ये अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना सावरण्यासाठी भांडीकुंडी आदी देण्याची गरज असून, १० कोटी रुपये अपेक्षित आहेत. परत जाणाऱ्या जादा निधीपैकी १० कोटी रुपये खर्च करण्याचा हेड नसल्याने हा विषय दीड महिना रखडला आहे. त्यामुळे वित्त विभागाशी चर्चा करून तो कोणत्या हेडखाली खर्च करता येईल, याचे मार्गदर्शन घेऊन तो खर्च केला जाईल. पावसामुळे जिल्ह्यातील ११ हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. भरपाईचा ९ कोटी ५८ लाखांचा प्रस्ताव गेला होता. त्यापैकी ८ कोटी ५० लाख रुपये प्राप्त झाले. सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा होईल.   

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com