कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यालय येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

गुढी पाडव्याला पहाटे एका संगीत मैफिलीचे आयोजन करून आणि गुढी उभारून अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करीत आहे.

साडवली - प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यालय गेली 20 वर्षे सातत्याने शाळेमध्ये गुढी पाडव्याला पहाटे एका संगीत मैफिलीचे आयोजन करून आणि गुढी उभारून अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करीत आहे. या वर्षीच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री. राविन्द्रजी माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. नलावडे सर यांनी केले. त्यानंतर झालेल्या संगीत कार्यक्रमामध्ये अॅड. गिरीश गानू, सौ. स्वरदा गानू, श्री. आशिष प्रभुदेसाई, कु. कुणाल भिडे, व श्री. अंकित जाधव यांच्याच बरोबर राविन्द्रजी माने यांचे चिरंजीव श्री. प्रद्युम्न माने यांनीही गीत गायन केले. कार्यक्रमाला तबला साथ श्री. किशोर भाट्ये यांनी तर हार्मोनियम साथ आशिष प्रभुदेसाई यांनी केली. कार्यक्रमात सादर झालेल्या सर्व गीतमालिकेला श्री. महेश उर्फ अप्पा आठल्ये यांनी आपल्या ओघवत्या भाषेतील निवेदनाने गुंफून कार्यक्रमाची रंगत वाढवली. 

कार्यक्रमाची सुरुवात श्री. प्रद्युम्न माने  यांच्या स्वरातील “हृदयाच्या तालावर नाचे गणेशु” या अजित कडकडे यांनी अजरामर केलेल्या प्रसिद्ध भक्ती गीताने झाली. सौ. स्वरदा गानू यांनी “एकतारी गाते गुरुनाम समर्था” या नंदू  होनप यांच्या संगीत साजाने नटलेल्या भक्तीगीताचे सुरेल सादरीकरण केले. “राधाधर मधुमिलिंद जय जय” हे पारंपारिक नाट्यगीत कु. कुणाल भिडे यांनी ताकदीने सादर केले. अॅड. गिरीश गानू यांनी श्री. गजानन वाटावे यांच्या स्वराजाने नटलेले “मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार” हे भावगीत आपल्या मुलायम आवाजात तन्मयतेने  सादर करून रसिकांची मने जिंकली. अंकित जाधव या तरुण गायकाने गिटारच्य साथीने “मन उधाण वाऱ्याचे” हे प्रसिद्ध चित्रपटगीत सादर करून वाहवा मिळवली. यानंतर स्वरदा गानू यांचे “मुला माणसात माझा विठ्ठल साजिरा”, गिरीश गानू यांचे “जेव्हा तुझ्या बटांना”, कुणाल भिडे याचे “हे सुरांनो चंद्र व्हा” या गाण्यांचे बहारदार सादरीकरण झाले आणि आशिष प्रभुदेसाई यांच्या “शेवटी शेवटी खूप आल्या सरी - चातका सारखा जन्म गेल्यावरी” या दत्तप्रसाद रानडे यांनी संगीतबद्ध केलेल्या कवि वैभव जोशी यांच्या गझलने कार्यक्रमाची सांगता झाली. 

यानंतर प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री श्री. राविन्द्रजी माने यांनी गेली वीस वर्षे सातत्याने कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली आणि उपस्थित नागरिकांना नववर्षाच्य हार्दिक शुभेच्छा दिल्या. यानंतर माने साहेबांच्या हस्ते शाळेच्या समोर सुशोभित गुढी उभारली गेली आणि सौ. माने यांच्या हस्ते तिचे पूजन केले गेले. सर्व उपस्थित नागरिकांनी संपूर्ण कार्य्रक्रमाला उत्तम प्रतिसाद देऊन एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत पाडाव्या निमित्त तयार केलेया कडूलिंबाच्या चटणी बरोबर मसाला दुधाचे प्राशन करून एकमेकांचा निरोप घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या शिक्षक आणि कारामाचाऱ्यानी विशेष परिश्रम घेतले. या अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करून आणि गेली वीस वर्षे सातत्याने त्याचे उत्साहात आयोजन करून कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यालयाने एक अनोखा आदर्शच समाजापुढे सादर केला आहे असे म्हणावे लागेल.

Web Title: gudhipadwa celebrates in meenatai thakarey school