रत्नागिरी गॅस, वीज कंपनी विभागणी लांबली

रत्नागिरी गॅस, वीज कंपनी विभागणी लांबली

गेल कंपनी उत्सुक, ब्रेकवॉटर वॉलचे काम मंदावले - एलएनजी टर्मिनलचा फायदा होणार 
गुहागर - रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीच्या विभागणीला वर्षभरात अंतिम स्वरूप मिळालेले नाही. त्यामुळे एलएनजी टर्मिनल पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आवश्‍यक ब्रेकवॉटर वॉलचे कामही मंदावले आहे. आरजीपीपीएलची वीज भारतीय रेल्वे खरेदी करू लागल्यामुळे आर्थिक चणचण संपली. विभागणी प्रक्रियेची गती मंदावण्याचे हे इंगीत आहे की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.  

एलएनजी टर्मिनलची कार्यवाही गेल (गॅस ॲथॉरिटी इंडिया लिमिटेड) कडून होते. परदेशातून द्रवरूप गॅस येथील टर्मिनलमध्ये उतरवतात. त्यावर प्रक्रिया करून गेल तो गॅस विकते. गेल्या वर्षात ऑक्‍टोबर ते मे या कालावधीत १.५ दशलक्ष टन गॅस उतरवण्यात आला. पुढील हंगामात २.५ दशलक्ष टन गॅस उतरविण्याचे लक्ष्य आहे. सध्याची ब्रेकवॉटर वॉल अपुरी आहे. ती पूर्ण झाल्यावर एलएनजी टर्मिनलवर बाराही महिने गॅसवाहू जहाज येऊ शकतील व ४ दशलक्ष टन गॅस उतरविणे शक्‍य होईल. या तऱ्हेने फायदा असल्याने गेल एक हजार कोटीची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. 

सप्टेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाने विभागणीच्या (डिमर्जर) प्रक्रियेला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत विभागणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. अनेक वित्तीय संस्था, भागधारक, पुरवठादार, वीज आणि गॅस खरेदीदार या सर्वांवर अन्याय न होता विभागणी होण्यासाठी निवृत्त न्यायाधीश व सर्व क्षेत्रांशी संबंधित उच्चस्तरीय अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली. त्यांच्यासमोर सुनावणीही झाली. तरीही विभागणी अंतिम टप्प्यात आलेली नाही. 

आरजीपीपीएलमधील तोट्यात असलेल्या वीज प्रकल्पाला भारतीय रेल्वेसारखा हुकमी ग्राहक मिळाला. दररोज ५०० मेगावॅट वीज तयार होऊ लागली. त्यातून नफा मिळत नाही; मात्र भांडवली व दैनंदिन खर्च भरून निघतो. शिवाय एलएनजी टर्मिनलमधून मिळणाऱ्या फायद्याने कंपनीचा ताळेबंद सुधारला. आरजीपीपीएलवरील आर्थिक बोजा संपवावा यासाठी तर विभागणीला विलंब होत नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे. आर्थिक खाईतून बाहेर आल्यावर विभागणी झाली की, दोन्ही प्रकल्पांना वित्तीय कंपन्या पैसा पुरवतील अशी अटकळ आहे.

२०१९ पर्यंत विभागणी पूर्ण...
२०१९ पर्यंत विभागणीचे काम पूर्ण होईल. एलएनजी टर्मिनलमधील ७० टक्के भाग गेल ताब्यात घेईल. ब्रेकवॉटरवॉल संदर्भातील प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. हे टर्मिनल पूर्ण क्षमतेने आम्ही चालवू, असा विश्वास गेलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक त्रिपाठी यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com