पालीत दिव्यांगांसाठी शासन योजनांचे मार्गदर्शन शिबीर

अमित गवळे 
रविवार, 2 सप्टेंबर 2018

या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकामार्फत संख्येने उपस्थीत दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी पाली सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीरात दिव्यांग लाभार्थींना अत्योदय योजनेच्या कार्डचे (स्वस्त धान्य कार्ड) वाटप करण्यात आले.

पाली (जि. रायगड) - जागृती अपंग कल्याणकारी संस्था पाली सुधागड यांच्या वतीने पालीत भक्तनिवास क्र. 1 येथे शनिवारी (ता.1) ला राष्ट्रीय दिव्यांग जन सक्षमीकरण दिनाचे औचित्य साधून अपंग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र व पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या विविध योजनांचे मार्गदर्शन शिबीर पार पडले.

या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकामार्फत संख्येने उपस्थीत दिव्यांग बांधवांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी पाली सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबीरात दिव्यांग लाभार्थींना अत्योदय योजनेच्या कार्डचे (स्वस्त धान्य कार्ड) वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील 999 लाभार्थींना पेंन्शनचा लाभ देण्यात आला. तसेच जि. प. च्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या योजनांचा लाभ मिळणेकामी आवश्यक फॉर्म भरुन घेण्यात आले. यावेळी दिव्यांग कलाकारांचा सत्कार करण्यात आला. 
 
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष साईनाथ पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. सन 1995 च्या कायद्यात बदल होउन दिव्यांग 2016 या नव्या कायद्यान्वये दिव्यांगांचा होणारा अवमान, अन्याय अत्याचार, हेळसांड, शोषण याविरोधात ऍट्रसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या स्वउत्पन्नातील 3 टक्के निधी दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी वापरात येत असे. आजमितीस 5 टक्के निधी दिव्यांगाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. दिव्यांग व गतीमंदाना शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे.

विधानसभेत दिव्यांगाचे प्रतिनिधीत्व करण्याची स्वतंत्र संधी देखिल प्राप्त होणार आहे. दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्यास संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून लाभार्थी घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन केले. यावेळी तहसलिदार बि.एन. निंबाळकर यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांच्या सक्षमिकरणासाठी विविध शासन योजना व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करुन लाभार्थ्याला प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यास प्रशासन कटिबध्द आहे. यावेळी अॅड. धनंजय धारप, गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास पाली पंचायत समिती सभापती साक्षी दिघे, पाली सुधागड तहसिलदार बि. एन. निंबाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, पाली सुधागड पं. स. गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.  धनंजय धारप, ग्रुप ग्रामपंचायत पाली प्रशासक महेश घबाडी, राकेश सावंत, जागृती अपंग कल्याणकारी संस्था पाली सुधागड संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर, उपाध्यक्ष रमेश मुल्ल्या, डॉ. अर्चना सिंग, महेश शिधोरे, अमृत गायकवाड, आदिंसह मान्यवर, दिव्यांग बांधव उपस्थित होते.

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी 100 टक्के शासन योजनांची अंलबजावणी करणारी व प्राप्त निधी दिव्यांगाच्या उत्कर्षासाठी खर्ची करणारी रायगड जिल्हा परिषद महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी व साईनाथ पवार यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची एकी सबंध महाराष्ट्राला आदर्शवत असून न्यायहक्कासाठी निघणारे यशस्वी मोर्चे व आंदोलने दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरत आहेत. दिव्यांग बांधवांना शासन योजनांपासून वंचीत ठेवणार्‍या राज्यातील 12 जि. प. च्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची धक्कादायक माहिती यावेळी साईनाथ पवार यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidelines Camp of Government Schemes for Divyang