गुजरात केशर यंदा रत्नागिरीतून वाशीत दाखल

गुजरात केशर यंदा रत्नागिरीतून वाशीत दाखल

रत्नागिरी - हवामान, माती यांच्या साधर्म्यामुळे गुजरातच्या प्रसिद्ध ‘केशर’ आंब्याची यशस्वी लागवड रत्नागिरीत होत आहे. मार्चअखेरीस गुजरातहून वाशीला येणारा केशर या वर्षी रत्नागिरीतून फेब्रुवारीतच वाशीत गेला आहे. गणेशगुळेतील (ता. रत्नागिरी) बागायतदार सुनील लाड यांच्या बागेतील आठ पेट्या वाशीला पाठविण्यात आल्या आहेत. हापूसप्रमाणेच त्याला दर मिळाल्याचे समाधान बागायतदारांना आहे.

शनिवारी (ता. २३) केशर आंबा वाशी बाजारात दाखल झाला. या आंब्याचे मूळ गुजरात-जुनागड येथे आहे. वाशीतील संचालक संजय पानसरे यांनी एक हजार रोपे श्री. लाड यांना लागवडीसाठी दिली होती. 

किनारी भागातील जमिनीत याची लागवड होते. कोकणातील किनाऱ्यांवर हवामान आणि परिस्थिती गुजरातप्रमाणे आहे. त्याचा फायदा केशर उत्पादनाला झाला. बागायतदारांनी पूरक अशी औषधे वापरल्यामुळे त्याचे उत्पादन लवकर आले. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे आंब्याला रंग चढला असून तो हापूस प्रमाणेच चवदार आहे. गेली चार वर्षे लाड यांच्या बागेतून केशर वाशीला जात आहे. गतवर्षी सुमारे सहाशे पेट्या गेल्या होत्या. या वर्षी दुप्पट उत्पादन मिळेल, असा विश्‍वास लाड यांना आहे. 

हापूसमध्ये तयार होणारा साका केशरमध्ये नाही. ही जात रायवळ आंब्याच्या अंशापासून तयार झालेली असल्यामुळे त्यात रोगप्रतिकारक शक्‍ती हापूसपेक्षा अधिक आहे. त्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम कमी होतो. संवेदनशील म्हणून हापूसची गणना होत असल्याने केशर लागवडीचा पर्याय निर्माण होत आहे.

सध्या रत्नागिरी, सिंधुदुर्गतून वाशीत गेलेल्या हापूसला दोन ते पाच हजार रुपये दर मिळतोय. दर्जेदार फळांना प्रती पेटीसाठी आठ हजार रुपये मिळतात. फेब्रुवारीत गेलेल्या केशरलाही तसाच दर मिळण्याचा विश्‍वास बागायतदारांना आहे. लाड यांच्याप्रमाणे काही बागायतदार हा प्रयोग करत आहेत.

वाशी बाजार समितीचे संजय पानसरे यांच्या प्रेरणेने गणेशगुळेत आठ वर्षांपूर्वी केशरची लागवड केली. तीन वर्षांनी उत्पादन मिळतेय. गुजरातचा केशर मार्चअखेरीस येतो, पण रत्नागिरीत तो फेब्रुवारीतच तयार होतो.
- सुनील लाड,
आंबा बागायतदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com