भोके-लांज्यास वादळी पावसाचा तडाखा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

रत्नागिरी/लांजा : तालुक्‍यातील भोके-रेवाळेवाडीला आणि लांजा भागाला काल (ता. 16) रात्री अवकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला.

घरांची छपरे उडाल्याने अंगणवाडीच्या इमारतीसह काही घरांचे नुकसान झाले. मुख्य विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने या भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला; परंतु या नैसर्गिक आपत्तीची जिल्हा प्रशासनाकडे सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती. 

गेल्या दोन दिवसांपासून वातारणातील थंडी गायब झाली होती. काल दिवसभर वातावरण ढगाळ होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्‍याच्या पूर्व भागातील गोविळ, शिपोशी, पालू, खेरवसे आदी गावांमध्ये वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानकपणे कोसळलेल्या या पावसाने साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली.

तालुक्‍यातील अद्यापही काही ठिकाणी भातझोडणीची कामे सुरू आहेत. अचानकपणे आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. सुमारे तासभर बरसलेल्या या पावसाने शहरवासीयांना झोडपून काढले. यामुळे शहर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे शहरात कोर्ले मार्गावर झाड उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळित झाली होती; मात्र त्यानंतर येथील कॉंग्रेसचे पदाधिकारी महेश सप्रे यांनी येथील लोकांना घेऊन मशिनच्या साह्याने झाड कापून मार्ग मोकळा केला.

रत्नागिरी तालुक्‍यातील भोके-रेवाळेवाडीलाही काल रात्री जोरदार पावसासह वादळाचा तडाखा बसला. तेथे अंगणवाडीची इमारत आणि काही घरांची छपरे उडाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. वादळामुळे रेवाळेवाडीत जनजीवन विस्कळित झाले; परंतुु सरपंच अंजली रेवाळे, तंटामुक्त अध्यक्ष दिनेश रेवाळे, रूपेश रेवाळे, राम रेवाळे, लक्ष्मण रेवाळे, सुरेश रेवाळे यांनी तातडीने मदतकार्य केले. या नैसर्गिक आपत्तीची माहिती जिल्हा प्रशासनाला उशिरापर्यंत नव्हती; मात्र या भागातील सर्कल, तलाठी घटनास्थळावर गेल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी साडेसातपर्यंत या आपत्तीची नोंद नव्हती.

Web Title: Hailstorm hits Kokan, Ratnagiri hard