चिपळूण, राजापूर, दापोलीत त्रिशंकू अवस्था

BJP_Shivsena
BJP_Shivsena


रत्नागिरी ः जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर पालिका व दापोली नगरपंचायतीच्या सत्तेच्या किल्ल्या भाजपकडे असल्याने या पक्षाच्या भूमिकेकडे साऱ्या राजकीय पक्षांकडे लक्ष लागले आहे; मात्र ठंडा करके खाओ, असा भाजपचा सध्याचा पवित्रा आहे. अद्याप वेळ आहे, एवढ्यात काही नाही, अशा संदिग्ध उत्तराने इतर पक्षांची बोळवण केली जात आहे. याबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील, वरच्या पातळीवर निर्णय होईल, अशी उत्तरेही या पक्षाच्या नेत्यांनी दिली आहेत. यामुळे आपल्या हातातील हुकमाचे पत्ते भाजपने राखून ठेवल्याचे स्पष्ट झाले.


दापोली व राजापूरमध्ये भाजपचा एक-एक नगरसेवक निवडून आला; मात्र तेथील सत्तेचा खेळ या एक-एक नगरसेवकांवर अवलंबून आहे. चिपळूणमध्ये नगराध्यक्षपद जिंकलेल्या भाजपने पाच जागा मिळवून चांगली कामगिरी केली. तेथे राष्ट्रवादीला फटका बसल्याने शिवसेनेने आघाडी मारली; मात्र सत्ता हस्तगत करण्यासाठी तेथेही भाजपची मदत आवश्‍यक ठरणार आहे. या तीनही ठिकाणी असा तिढा निर्माण झाल्यामुळे भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चिपळुणात शिवसेनेच्या सोबत गेल्यास युतीची सत्ता पालिकेत प्रथमच येईल. दापोली व राजापूरमध्ये युतीला संधी आहे; मात्र याबाबत स्थानिक नेते काही बोलण्यास तयार नाहीत. ज्येष्ठ नेते ठरवतील त्याप्रमाणे निर्णय होईल, असे सांगून इतर पक्षांना टांगते ठेवले आहे. निवडणुकीच्या तोंडावर युती जाहीर झाली. त्यामुळे युती करण्यास अद्याप वाव आहे. शिवाय राजकीय तडजोड हा भाग आहेच. स्थानिक पातळीवरील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा कल घेऊन भाजपचे नेते निर्णय घेणार आहेत. शिवसेनेने याआधीही युतीसाठी हात पुढे केलेला आहे. राजापूर व दापोली येथे शिवसेनेने भाजपला सोबत घेण्याचे स्पष्ट संकेतही दिले. सूर्यकांत दळवी, किशोर देसाई व योगेश कदम यांनी भाजपच्या कार्यालयात निकालानंतर पायधूळ झाडली, तेव्हाच हे स्पष्ट झाले. संजय कदम यांनी तर भाजपला बरोबर घेण्याची जाहीर ऑफरच दिली. चिपळुणात शिवसेनेकडून अद्याप काही हालचाल झालेली नाही. सत्ता स्थापनेसाठी पक्षप्रमुख जो आदेश देतील तसे काम केले जाईल, असे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी सांगितले.

"शहराच्या विकासासाठी भाजपच्या नगराध्यक्ष सौ. सुरेखा खेराडे यांना शहरवासीयांनी पसंती दिली. सत्तेसाठी सोबत कोणाला घ्यायचे याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील.''
- विजय चितळे, प्रचारप्रमुख, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com