वातावरणातील विचित्र बदलातही हापूस येथे ‘राजाच’

शिरीष दामले
मंगळवार, 18 एप्रिल 2017

रत्नागिरी - वातावरणातील बदलामुळे फळांचा राजा संकटात आला. कोठे तो करपला, कोठे फलधारणा व्हायच्या वेळी उन्हाचा ताप, तर कोठे मोठ्या प्रमाणावर गळ झाली. काही ठिकाणी तर आंबा भाजला. या स्थितीतही चिपळूण व गुहागर तालुक्‍यातील काही बागांमध्ये हवामानाच्या बदलांना तोंड देत हापूस प्रत्येक झाडाला लगडलेला दिसतो. या वर्षीच्या हंगामात असे सुखद चित्र पाहायला मिळत आहे ते ॲड. संजय केतकर यांच्या बागांमध्ये. भरपूर थंडी व भरपूर उष्मा याला धूप न घालता हा आंबा कसा टिकला व वाढला हे अभ्यासणे हे या क्षेत्रातील जाणकारांसाठी आव्हान आहे. 

पेशाने वकील असूनही १९९४ पासून ॲड. केतकर यांनी आंबा बागायती फुलवण्याचा ध्यास घेतला. गेली सहा ते सात वर्षे स्वतःचे सामान्य ज्ञान, निरीक्षण शक्ती आणि आंबा पिकवायचाच अशा जिद्दीने ते काम करीत आहेत. भिले, करंबवणे, केतकी तसेच मालदोली अशा ठिकाणच्या बागा त्यांनी केल्या आहेत. उत्तम उत्पादन घेण्यात ते यशस्वीही झाले. या मोसमात ही बाब अधोरेखित झाली. मात्र त्याची शास्त्रीय कारणे सिद्ध करणे हा त्यांचा प्रांत नाही. 

बागांची स्वच्छता, खड्डे व चर, कंपोस्टचा उपयोग, जीवामृत तसेच यज्ञात वापरण्याच्या समिधांचा बागेत धूर, बागेला पाणी देणे,जीवामृताच्या फवारण्या ही त्यांच्या यशाची महत्त्वाची सूत्रे आहेत. यापैकी नवीन काही नाही. मात्र सातत्य आणि आंबा मिळण्याचे प्रमाण हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. बागांची निगा राखलीच पाहिजे. या तत्त्वामुळे त्यांच्या बागा अत्यंत स्वच्छ असतात. बागेतील प्रत्येक बांडगुळ ते काढून टाकतात. कलमे अगदी स्वच्छ करतात. बागेतील जंगल नुसते तोडत नाहीत, तर खणून काढतात. हे सातत्यपूर्ण सुरू असते. कारण जंगल पुन्हा वाढते. मात्र वारंवार साफ केल्याने त्याची घनता कमी होते. साफसफाईमुळे बाग वणव्यापासून सुरक्षित राहते. 

खाडीपट्ट्यात आंबा चांगला होतो. परंतु या वर्षी सर्वत्र ताप झाला आहे. माझ्या बागांमध्ये वातावरणाच्या बदलाने फारसा परिणाम केला नाही. बागेबाहेर पाच फुटावर उष्ण वातावरण असताना बागेमध्ये थंडावा असतो. हे कोणत्या कारणाने झाले ते सांगणे कठीण आहे. पण वास्तव हे आहे की माझ्या बागा आंब्याने फुलल्या आहेत.
- ॲड. संजय केतकर, बागायतदार

Web Title: Hapus mango