हापूसचा युरोप प्रवास आता थेट रत्नागिरीतून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

रत्नागिरी - रत्नागिरीतील आंबा निर्यात सुविधा केंद्राला "अपेडा'चे प्रमाणीकरण मिळालेले नसल्याने आतापर्यंत परदेशी निर्यातीसाठी वाशीवर अवलंबून राहावे लागत होते; मात्र प्रमाणीकरण झाल्यामुळे युरोपला थेट या पॅकहाउसमधून आंबा पाठविणे शक्‍य होणार आहे. तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलियातील निर्यातीसाठीच्या प्राथमिक प्रक्रियाही येथेच होणार आहेत. आज "अपेडा'च्या पथकाने या केंद्राला हिरवा कंदील दिल्यामुळे हापूसचा रत्नागिरीतून थेट परदेशी प्रवास सुकर झाला आहे.

राज्य कृषी पणन मंडळातर्फे उभारलेल्या हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राच्या प्रमाणीकरणासाठी "नॅशनल प्लॅंट प्रोटेक्‍शन ऑर्गनायझेशन' (नवी दिल्ली), "ऍग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड व प्रॉडक्‍ट्‌स एक्‍स्पोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी' (अपेडा) आणि कृषी व सहकार विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी आंबा निर्यात केंद्राची तपासणी केली. रत्नागिरीतील ही सुविधा सद्‌गुरू एन्टरप्रायजेस्‌ यांच्यामार्फत चालविली जात आहे.

दोन वर्षे रत्नागिरीतील या निर्यात केंद्रातून आंबा परदेशात गेला नव्हता. वॉशिंग आणि प्री-कूलिंगची सुविधा येथे उपलब्ध आहे. तसेच, रत्नागिरीतून थेट युरोपला आंबा पाठविण्यासाठी उष्णजलची यंत्रणाही येथे आहे; परंतु आंबा बागायतदारांनी याचा लाभ घेतला नव्हता. आज या केंद्राची तपासणी करून अपेडाने ते प्रमाणित केल्याने याचा उपयोग सुरू झाला. युरोपसाठी उष्णजल प्रक्रिया अत्यावश्‍यक आहे. ही सेवा रत्नागिरीत होणार असल्याने निर्यातदार थेट बागायतदारांशी संपर्क साधून कार्यवाही करू शकतात. वाशीतून आंबा पाठविताना बागायतदारांच्या पदरी किंमत कमी मिळत होती. आता तो प्रश्‍न कायमचा निकाली निघणार आहे.

जुन्याच निकषांचा वापर
उष्णजल प्रक्रियेसाठी 48 अंश सेल्सिअसला 60 मिनिटे आंबा ठेवणे आवश्‍यक आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर आंबा पोळून त्यात साका होण्याची भीती काही बागायतदारांनी व्यक्‍त केली होती. त्यानुसार कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल "अपेडा'कडे पाठविला. त्यात 47 अंश सेल्सिअसला 50 मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी अशी सूचना केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही, त्यामुळे या केंद्रातून जुन्याच निकषाचा वापर केला जाणार आहे.

Web Title: hapus mango europe ratnagiri