रायगडावरील हत्ती तलावाची गळती निघणार

सुनील पाटकर
रविवार, 11 नोव्हेंबर 2018

रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंपैकी हत्ती तलाव एक महत्वाची वास्तू आहे. रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पाणी नियोजनामध्ये हत्ती तलावाचा समावेश असुन काळाच्या ओघात हत्ती तलावाला गळती लागली. चाळीस वर्षांपूर्वी या तलावाची दुरुस्ती झाली होती. मात्र या तलावाची गळती दूर न झाल्याने या तलावात गेली कित्येक वर्ष पाणीसाठा राहिला नाही.

महाड - रायगडावर असलेला ऐतिहासिक हत्ती तलावात पाण्याच्या गळतीमुळे पाण्याचा थेंबही साठत नसे व तलाव कोरडा ठणठणीत पडत असे. आता या तलावाच्या गळतीचा शोध लागला असुन हत्ती तलाव पुन्हा पाण्याने भरणे शक्य होणार आहे. यामुळे तलावात पाणी साठा होऊन गडावरील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंपैकी हत्ती तलाव एक महत्वाची वास्तू आहे. रायगडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या पाणी नियोजनामध्ये हत्ती तलावाचा समावेश असुन काळाच्या ओघात हत्ती तलावाला गळती लागली. चाळीस वर्षांपूर्वी या तलावाची दुरुस्ती झाली होती. मात्र या तलावाची गळती दूर न झाल्याने या तलावात गेली कित्येक वर्ष पाणीसाठा राहिला नाही. यामुळे वाढत्या पर्यटकांना केवळ गंगासागर तलावाचाच सध्या आधार आहे. वाढत्या पर्यटकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. रायगडावर सध्या रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून दुरुस्तीची कामे सुरु आहेत. या कामातून हत्ती तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. 

अशी सापडली गळती -
या तलावातून गाळ काढल्यामुळे तलावाच्या भिंतीशेजारी एक खोल खड्डा आढळला . खड्याच्या दोन्ही बाजूला अंदाजे 5 फुटाच्या घळी दिसून आल्या. यातून हि गळती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हि गळती दिसून आली. हि गळती काढण्यासाठी आता शास्त्रीय पद्धतीने काम केले जाणार आहे. चुन्याची स्लरी वापरून टप्याटप्याने तलावाची गळती काढली जाणार आहे. चुन्याची स्लरी गळतीच्या भागात टाकून स्थीर केली जाणार आहे. ही स्लरी स्थीर होण्याकरीता जवळपास 21 दिवसांचा कालावधी लागतो.

रायगडावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमीं येतात. गडावर मोठे कार्यक्रम होतात. अशावेळी गडावर पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवते. हि टंचाई हत्ती तलावाच्या दुरुस्तीने भरून निघणार आहे.प्रत्यक्ष कामानुसार यावर खर्च अपेक्षित आहे.

हत्ती तलाव हा बांधीव तलाव आहे. 36.5 X 23 मी. असा तलावाचा आकार आहे. या तलावामध्ये जवळपास दीड कोटी लिटर पाणी साठा होत असण्याची शक्यता आहे. या तलावाचा वापर शिवकाळात हत्तींसाठी होत असावा म्हणून याचे नाव हत्ती तलाव पडले असावे. तलावात उतरण्यासाठी कोठेही पायऱ्या नाहीत.

हत्ती तलावाची गळतीचे कारण प्राथमिक टप्प्यात सापडले आहे. यामुळे पूर्वी ज्या पद्धतीने दुरुस्ती झाली होती त्यापेक्षा शास्त्रीय पद्धतीने केली जाणार आहे. चुना आणि अन्य घटकांचे मिश्रण करून तलावाच्या गळक्या भागात स्थीर केले जाणार आहे. यातून हि गळती निघेल अशी आशा आहे. - वरूण भाम्बरे (रायगड प्राधिकरण आरेखक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hatti lake leakage on Raygad issue