मच्छीमार - जलक्रीडा व्यावसायिक यांच्यातील वाद अखेर मिटला

मच्छीमार - जलक्रीडा व्यावसायिक यांच्यातील वाद अखेर मिटला

मालवण - शहरातील चिवला वेळा येथील समुद्रात मासेमारी क्षेत्रात सुरू असलेल्या जलक्रीडा प्रकारामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर यापुढे रापण पद्धतीच्या मासेमारी क्षेत्राच्या बाहेर पॅरासेलिंग तसेच अन्य जलक्रीडा केल्या जातील असे जलक्रीडा व्यावसायिकांनी स्पष्ट केले. त्यामुळे रापणकर मच्छीमार व जलक्रीडा व्यावसायिक यांच्यातील वाद अखेर सामंजस्याने मिटला.

चिवला वेळा येथील समुद्रात पारंपरिक रापणकर मासेमारी करतात. त्याचबरोबर या समुद्रात जलक्रीडा व्यवसायही चालतो. मात्र सध्या जलक्रीडा प्रकारातील पॅरासेलिंग, स्कूबासाठीच्या नौका रापण पद्धतीच्या मासेमारीच्या क्षेत्रातून जात असल्याने आपल्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर बंदर कार्यालयात मच्छीमार नेते बाबी जोगी यांच्या पुढाकारातून रापणकर मच्छीमार व जलक्रीडा व्यावसायिकांची आज सायंकाळी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक झाली.

यावेळी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उलगमुगले, बंदर अधिकारी सुषमा कुमठेकर, चिवला बीच वॉटरस्पोर्टस्चे अध्यक्ष मनोज मेतर, ताता मसुरकर, रूजाय फर्नांडिस, विनोद वेंगुर्लेकर, भाई कासवकर, चंद्रशेखर मयेकर, योगेश मंडलिक यांच्यासह रेवतळेकर रापण संघ, रामा मणचेकर रापण संघ, महेश हडकर रापण संघ, न्यू रापण संघ, जुने रापण संघ, सांताक्रूझ रापण संघाचे विजय फाटक, बस्त्याव आल्मेडा, पावलू मेंडिस, रामा मणचेकर, महेश हडकर आदी मच्छीमार उपस्थित होते.
यावेळी मच्छीमारांनी जलक्रीडा प्रकाराचा जो पिकअप पॉइंट आहे तेथे जाण्यासाठी जलक्रीडा व्यावसायिक मासेमारी क्षेत्रातून नौका नेत असल्याने मासळी पळून जाते.

शिवाय पॅरासेलिंगच्या नौकांचा आवाज मोठा असल्याने त्याचाही रापणीच्या मासेमारीवर परिणाम होत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर जलक्रीडा व्यावसायिकांनी पिकअप पॉइंटच्या ठिकाणी जाणार्‍या नौका यापुढे किनार्‍यालगतच्या मार्गाने जातील तसेच पॅरासेलिंगच्या नौका रापण मासेमारी क्षेत्राच्या बाहेरच असतील असे स्पष्ट करण्यात आले. यावर मच्छीमारांनी पॅरासेलिंग जलक्रीडा डिसेंबरपूर्वीच सुरू करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली. सध्या दिवाळी हंगाम असल्याने पॅरासेलिंग सुरू केले असून ते मासेमारी क्षेत्राच्या बाहेरच सुरू ठेवले जाईल असे स्पष्ट केले. या यशस्वी तोडग्यानंतर हा वाद सामंजस्याने मिटला. 

दोन्ही व्यावसायिक हे मच्छीमारच आहेत. त्यामुळे रापण व जलक्रीडा व्यावसायिकांनी आपल्याला ज्या भागात व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे त्याच क्षेत्रात व्यवसाय करावा. दोघांनी समन्वयातून व्यवसाय केल्यास वाद होणार नाहीत असे स्पष्ट करत बंदर अधिकारी सुषमा कुमठेकर यांनी चिवला वेळा येथे जात संबंधित व्यावसायिकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात असा आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन उलगमुगले यांनी दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com