esakal | तडफडणाऱ्या म्हशीसाठी ते धावले अन् घडला अनर्थ.... सिंधुदुर्गात कुठे घडली घटना...वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

0

सुनील घराबाहेर येऊन म्हैस कशामुळे तडफडत आहे, हे पाहण्यासाठी गेले.

तडफडणाऱ्या म्हशीसाठी ते धावले अन् घडला अनर्थ.... सिंधुदुर्गात कुठे घडली घटना...वाचा

sakal_logo
By
भूषण अरोसकर

सावंतवाडी : तडफडत असलेल्या म्हशीला पाहण्यासाठी गेलेल्या येथील आरपीडीमधील शिक्षकाचा शॉक लागून मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुनील श्रीराम सावळे (वय 32, रा. कारिवडे पेडवेवाडी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 

सकाळी सुनील सावळे यांच्या शेत मांगराजवळ एक म्हैस तडफडत असल्याची त्यांचा भाऊ परमेश्‍वर सावळे यांना दिसून आले. याबाबत त्यांनी भावाला कल्पना देण्यासाठी हाक मारली. सुनील घराबाहेर येऊन म्हैस कशामुळे तडफडत आहे, हे पाहण्यासाठी म्हशीजवळ गेले. म्हशीला स्पर्श करताच त्यांना विजेच्या धक्का बसला आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा भाऊ परमेश्‍वर यांना याची कल्पना येताच त्यांनी धावत जाऊन स्थानिक तसेच कुटुंबीयांना माहिती दिली. सुनील यांना तातडीने मोटारीतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. याबाबत येथील पोलिस ठाण्यात त्यांचा भाऊ परमेश्‍वर यांनी वर्दी दिली आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक गुरुदास भागवत यांनी पंचनामा केला. 

सुनील सावळे कारिवडे पेडवेवाडी येथे 15 वर्षांपासून राहावयास होते. ते येथील राणी पार्वतीदेवी महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक होते. ते होडावडेवरून (ता. वेंगुर्ले) कारिवडेत आले होते. त्यांचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षांचा एक मुलगाही आहे. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. त्यांचा मृत्यूची बातमी समजतात येथील शिक्षक व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थीप्रिय शिक्षक व मनमिळावू स्वभाव अशी त्यांची ओळख होती. 
 

संपादन ः विजय वेदपाठक

loading image
go to top