सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणावर भर 

health system planning konkan sindhudurg
health system planning konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करून विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून काम करण्याचा निर्धार शुक्रवारी सिंधुदुर्गनगरी येथे "सिंधुदुर्ग आरोग्य मिशन'च्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच आरोग्य हक्क परिषद आयोजित करण्याचा आणि जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, मंत्रालय पातळीवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णयही यावेळी झाला. बैठकीनंतर मिशनच्या सदस्यांनी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून विधायक प्रतिसाद मिळाला. 

"सिंधुदुर्ग आरोग्य मिशन'च्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यात सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, कुटीर रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील 38 प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रे अशी मोठी आरोग्य यंत्रणा आहे. तथापि वैद्यकीय अधिकारी, अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणातील रिक्त पदे, साधनसामग्रीची वानवा, साधने असुनही त्यांचा वापर न होणे, औषधांचा कमी पुरवठा, नादुरुस्त रुग्णवाहिका अशा अनेक समस्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा त्रस्त आहे. परिणामी दरवर्षी लक्षावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नाही. याचा अभ्यास करून प्रशासनाशी विविध पातळीवर संपर्क व समन्वय साधून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व समविचारी नागरिक एकत्र आले असून त्यांनी "सिंधुदुर्ग आरोग्य मिशन' हे व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामवंत नागरिक, डॉक्‍टर, पत्रकार वगैरेंचा समावेश आहे. केवळ आरोग्य या विषयासाठीच हे बिगरराजकीय व्यासपीठ सेवाभावी भावनेतून स्थापन केले आहे. 

सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या मिशनच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटी कोणत्या आहेत, त्यावर विचार झाला. या समस्यांवर कशी मात करता येईल, याचा एक आराखडाही तयार करण्यात आला. या बैठकीला आधार फाउंडेशनचे सचिव नंदन वेंगुर्लेकर, "घुंगुरकाठी' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री, डॉ. प्रविण सावंत, प्रमोद लिमये, निखिल सिद्धये उपस्थित होते. मिशनच्या शिष्टमंडळाने बैठकीनंतर प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अपर्णा गावकर यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली. यावेळी निवासी आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश नलावडे, फार्मासिस्ट अनिल कुमार देसाई, आस्थापना प्रमुख दिगंबर देसाई आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे जिल्हा समन्वयक संतोष सावंत उपस्थित होते. 

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमधील वर्ग-1 व वर्ग-2 च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्या तातडीने भरण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर परिचारिका व अन्य पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबतही चर्चा झाली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारखी अतिशय उपयुक्त योजना पुरेशा प्रसिद्धीअभावी लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. जिल्ह्यातील किती खासगी हॉस्पिटल या योजनेशी संलग्न आहेत, याची माहितीही उपलब्ध नाही. यामुळे एका अतिशय चांगल्या योजनेला जिल्ह्यातील नागरिक मुकत आहेत. यासाठी या योजनेची चांगली प्रसिद्धी करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. 

"108' वरदान, मात्र... 
108 रुग्णवाहिका सेवा ही रुग्णांसाठी वरदान आहे. तथापि ही सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून ही सेवा चांगल्या पद्धतीने दिली जात नाही. या रुग्णवाहिकांवर काम करणारे वैद्यकीय अधिकारी व वाहन चालक यांच्या अनेक समस्या आहेत. याबाबत संबंधित व्यवस्थापकांसोबत एक बैठक आयोजित करण्याची विनंतीही करण्यात आली. जिल्ह्यात कोविड-19चा उपद्रव पुन्हा वाढू लागला आहे. तथापि जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेले नाही. याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन ते पूर्ण क्षमतेने चालू करावे, अशी मागणीही झाली. 

खासगी रुग्णवाहिकांचा मुद्दा चर्चेत 
खासगी रुग्णवाहिकांचा मुद्दाही चर्चेला आला. खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानीला चाप लावून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंतीही शिष्टमंडळाने केली. अडचणीत असलेल्या रुग्णांकडून खासगी रुग्णवाहिका मनमानी पद्धतीने भाडे वसूल करते. रुग्णवाहिकेला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कर माफी दिलेली असते. त्यामुळे ही सेवा किमान दरात उपलब्ध असणे आवश्‍यक आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्हा रुग्णालय व अन्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्धारही करण्यात आला.

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com