मालवणात पावसाने हाहाकार

मालवणात पावसाने हाहाकार

मालवण : मुसळधार पावसाने तालुक्‍यात हाहाकार उडविला. शहरासह तालुक्‍यात अनेक ठिकाणे झाडे, फांद्या पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत तारांवर झाडे पडूनही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या ने केलेल्या कहरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

पावसामुळे रस्ते, गटारे पाण्याने तुंबली असून, शहरातील अनेक वाड्यांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. स्थानिक नगरसेवकांनी सकाळपासून आपला सहभाग देत साचलेल्या पाण्यास वाट मोकळी करून देण्याचे काम केले. काल (ता. 28) रात्रीपासून खंडित असलेला पुरवठा आज सायंकाळपर्यंत पूर्ववत झालेला नव्हता.

दरम्यान, या वर्षी प्रथमच पावसाला वाऱ्याची जोड नसल्याने देवबाग, तळाशीलला सागरी लाटांचा मारा बसलेला नाही; मात्र दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस पडला आहे. 

या वर्षी येथे दमदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही वर्षांतील पावसाळ्याची परिस्थिती पाहता जून महिन्यात एवढा पाऊस कधीच कोसळला नव्हता. जून महिना अद्याप संपलेला नसून, आतापर्यंत सुमारे 1400 हून अधिक मिलिमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर येथे वाढला आहे. वारा नसला, तरी मुसळधार पावसामुळे तालुक्‍यात हाहाकार उडविला आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे, फांद्या घरांवर पडल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहे. शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गतिरोधक घालण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. परिणामी पादचाऱ्यांसह, वाहनचालकांचेही हाल झाले आहेत.
 

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढल्याने शहरात ठिकठिकाणी झाडे पडली. यात विद्युत तारा तुटून महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील आत्मश्री कपांउंड येथील आंब्याचे झाड काल सायंकाळी विद्युत तारांवर पडले. या झाडाच्या फांद्या फोवकांडा पिंपळपार येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच पडल्याने हा मार्ग बंद झाला होता. याची माहिती मिळताच नगरसेवक दीपक पाटकर यांनी भर पावसातच पालिका कर्मचाऱ्यांनी रात्रभर रस्त्यावरील हे झाड हटविले; मात्र विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. स्थानिक रहिवाशांनी मदतकार्यात सहभाग घेतला. वायरी येथील कोळगे कुटुंबीयांच्या घरावर चिंचेचे मोठे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. यासह शहरातील अन्य भागांतही झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्‍यातील तळाशील येथील आवारानजीक राहणाऱ्या भरत कोचरेकर यांचे घर मुसळधार पावसात जमीनदोस्त झाले आहे.
 

मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाला आहे. धुरीवाडा भागात आज सकाळी स्थानिक नगरसेवक मंदार केणी यांनी पुढाकार घेत पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या साचलेल्या पाण्यास वाट मोकळी करून दिली. मुसळधार पावसामुळे शहर परिसरातील मळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नद्या, नाल्यांना पूर आला असून, त्या दुथडी भरून वाहत आहेत. दरवर्षी घुमडे येथील ओहोळाच्या पाण्यात वाढ होत असल्याने ओहोळानजीकच असणाऱ्या घुमडाई मंदिरात पाणी घुसते. या वेळीही मुसळधार पावसामुळे मंदिरात पाणी घुसण्याची शक्‍यता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
 

देवबाग, तारकर्ली सुरक्षित 

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस देवबाग, तारकर्ली भागास सागरी उधाणाचा तडाखा बसतो. या वर्षी मुसळधार पाऊस कोसळत आहे; मात्र वादळी वारे नसल्याने सागरी लाटांच्या तडाख्यातून सध्या तरी देवबाग, तारकर्लीचा धोका टळला आहे. सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस कोसळतो तेवढा पाऊस याच महिन्यात कोसळला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सदानंद तांडेल यांनी सांगितले. वाऱ्यांचा जोर नसल्याने तळाशीलच्या किनारपट्टी भागास बसणारा सागरी लाटांचा मारा टळला आहे.
 

अंधाराचे साम्राज्य
शहरात ठिकठिकाणी विद्युत तारांवर झाडे पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी शहरातील वीजपुरवठा सुमारे सोळा तासांहून अधिक काळ खंडित झाला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे गृहिणींचे आज मोठे हाल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com