अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील सात धबधब्यांवर "नो एंट्री'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

रत्नागिरी  - अतिवृष्टीच्या काळात पर्यटनासाठी प्रसिद्ध धबधब्यांवर जाण्यास "नो एंट्री'चा निर्णय घेतला असून, त्या कालावधीत पोलिस तैनात केले जाणार आहेत. सवतकडा (ता. राजापूर) येथील घटनेनंतर झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे. हवामान विभागाने संभाव्य अतिवृष्टीविषयक इशारा दिल्यामुळे सध्या धूतपापेश्वर, सवतकडा, उक्षी, निवळी, मार्लेश्वर, पानवल, सवतसडा या जिल्ह्यातील अन्य धबधबे व धरणांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात उपाययोजनांसाठी बैठक झाली. सवतकडा येथील घटनेत अनुचित प्रकार घडला नाही. भविष्यात हे टाळण्यासाठी जिल्हा परिषद, तहसील प्रशासन, ग्रामपंचायतीला जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. नदी उगमाजवळ पाऊस पडला की धबधब्याचे पाणी वाढते. तोच प्रकार सवतकडा येथे घडला. अचानक वाढलेले पाणी पर्यटकांच्या लक्षात आले नाही. हे लक्षात घेऊन हवामान विभागाकडून अंदाज वर्तविल्यानंतर धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. काठावर पर्यटक जाऊन मौजमजा करू शकतील; परंतु त्यांना पाण्यात उतरता येणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत.

"रत्नदुर्ग'चे अभिनंदन
पर्यटकांची सुटका करणाऱ्या रत्नदुर्ग माउंटेनिअर्स सदस्यांचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अभिनंदन केले असून, त्यांचा जिल्हा प्रशासनाकडून विशेष सन्मान केला जाणार आहे.

धबधब्यांवर लोक हुल्लडबाजी करतात. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येतात. ग्रामपंचायतीने परिसरात सुविधा दिल्या पाहिजेत. रविवारी (ता.8) सवतकडा येथे दोन हजार पर्यटक होते. पाणी वाढल्यानंतर ते बाहेर येत होते; मात्र अशावेळी अफवा पसरवू नयेत.
- गणेश चौघुले, रत्नदुर्ग सदस्य

Web Title: heavy rain 7 waterfall no entry