Photo : कोकणात मुसळधार ; मळ्यातच भात कुजण्याची भिती

राजेश कळंबट्टे | Sunday, 11 October 2020

पावसाचा जोर असाच राहीला तर भातशेती मळ्यातच कुजेल की काय अशी स्थिती आहे.

रत्नागिरी : ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने भातशेतीला दणका दिला. जिल्ह्यात शनिवारी सांयकाळपासून सुरु असलेला पावसाचा धुमाकूळ रविवारीही सुरुच होता. कापलेलं भात मळ्यामध्ये अक्षरशः तरंगत असून शेकडो एकरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर भातशेती मळ्यातच कुजेल की काय अशी स्थिती आहे.

रविवारी (ता. 11) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 11.21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 3.40, दापोली 2.80, खेड 22.40, गुहागर 3.60, चिपळूण 8.80, संगमेश्‍वर 15.80, रत्नागिरी 22.80, लांजा 8.30, राजापूर 13 मिमी पाऊस झाला. 1 जुनपासून आजपर्यंत सरासरी पावसाची नोंद 2,672 मिमी आहे. हवामान विभागाकडून 14 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा इशारा दिलेला होता. त्यानुसार सलग दोन दिवस संततधार सुरु आहे.

शनिवारी सायंकाळी दिवसभर मळभी वातावरण होते. सकाळी ढग भरुन आले, लगेचच वातावरण निवळले. त्यामुळे गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजा भातकापणीत गुंतलेला होता. पावसाचा अंदाज नसल्यामुळे अनेकांनी भातं कापून सुकवण्यासाठी मळ्यामध्ये ठेवलेली होती. अचानक सुरु झालेल्या पावसाने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. अनेकांनी भात तसेच ठेवून घरी जाणे पसंत केले. रात्रभर पडलेल्या पावसाने सुकवण्यासाठी ठेवलेले भात पूर्णतः भिजून गेले. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलका पाऊसही पडत होताच.

कापलेलं भात गोळा करुन काहीच उपयोग नसल्याने शेतकर्‍यांनी ते सुकवण्यासाठी ठेवले. रविवारीही पाऊस कायमच असल्याने भात पाण्यावर तरंगत आहे. चोविस तास पाण्यात राहील्यामुळे लोंब्या काळ्या पडल्या असून त्या कुजून जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी लोंबी गळून जाऊन पुन्हा रुजु शकते.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 15 हजार हेक्टरवरील हळव्या बियाण्यांची कापणी पूर्ण झाली होती. ते भात सुकवून मळणी करून घरातही गेलं. ऐन कापणीत पावसाने गोंधळ घातल्याने चाळीस टक्के कापण्या रखडल्या आहेत. त्यापाठोपाठ गरव्या, निमगारव्या भाताची कापणीही संकटात सापडली आहे. त्यातील काही शेतं पावसामुळे आडवी झाली आहेत. दोन दिवसात झालेल्या सततच्या पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. या नुकसानीमुळे भाताच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील जयगड, खंडाळा, पन्हळी, सैतवडे, वरवडे, गणपतीपुळे परिसरातही पावसाच जोर होता. गतवर्षी भाताला पावसामुळे कोंब आले होते. यावर्षीही तशीच परिस्थिती होणार आहे. रानटी प्राण्यांचा त्रासातून वाचलेली शेती पावसात अडकली आहे. पावसामुळे पावस परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर साचून राहीले होते.

 

पावसामुळे पाली परिसरातील काही शेतकर्‍यांनी भात कापून ठेवले होते. ते पूर्ण भिजले असून आज पुन्हा पाऊस पडत असल्यामुळे उद्या नुकसान होणार आहे.

- संदीप कांबळे, पाली, रत्नागिरी

संपादन - अर्चना बनगे