heavy rain konkan sindhudurg
heavy rain konkan sindhudurg

मुसळधार, पूरस्थिती, पडझड अन् धास्ती

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -दोन ते तिन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसासोबतच वादळी वाऱ्याचाही जोर असल्याने किनारी भागाला असस्त्र लाटांचा तडाखा बसत आहे. एकूणच या मुसळधार पावसामुळे कोकणतील जनजीवन विस्कळीत झाले आहेच, शिवाय कोकणवासीयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मालवण, आचरा, दोडामार्ग भागांतील पावसाचा हा एकत्रीत वृत्तांत. 

मालवणला झोडपले 
मालवण ः शहरासह संपूर्ण तालुक्‍यास मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे नद्या, नाले दुधडी भरून वाहत होत्या. तालुक्‍यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत. शहरातील मेढा येथील पुरातन नाभानाथ मंदिर मुसळधार पावसात कोसळले. जेसीबीच्या साहाय्याने ते हटविण्याचे काम सुरू होते. 

गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर आणखीनच वाढल्याचे दिसून आले. समुद्राच्या अजस्र लाटांचा तडाखा किनारपट्टी भागात सुरू होता. तालुक्‍यातील नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. यात साळेल येथील सहदेव आचरेकर यांच्या घरावर रतांब्याचे झाड पडून 1400 रुपयांचे नुकसान झाले. कोळंब न्हिवे येथील स्वप्नील परब यांच्या राहत्या घरावर फणसाचे झाड पडून 5 हजार रुपयांचे नुकसान झाले.

कुणकवळे येथील सूर्यकांत निकम यांच्या राहत्या घरावर दुपारी सागाच्या झाडाची फांदी पडून 1525 रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधित तलाठ्यांनी घटनास्थळी जात नुकसानीची पंचयादी केली आहे. 
मुसळधार पावसाच्या तडाख्यात मेढा येथील पुरातन नाभानाथ मंदिर कोसळल्याची घटना घडली आहे. हे पुरातन जीर्ण झाले होते. दुपारी मुसळधार पावसात ते पूर्णतः कोसळले. जेसीबीच्या साहाय्याने मंदिराचे जीर्ण अवशेष हटविण्याचे काम सुरू होते. 

आचऱ्यात जोरदार पाऊस 
आचरा ः थोडी उसंत घेतलेल्या पावसाने आज पहाटेपासूनच जोरदार सुरुवात केल्याने नदी नाल्यांना पूर आले आहेत. गडनदीला पूर आल्याने आचरा कणकवली रोडवर ठिक ठिकाणी पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर श्रावण नदी वाडी येथे रस्त्यावरच आकेशियाचा मोठा वृक्ष पडून रस्ता बंद झाला होता. 

गडनदीला आलेल्या पूरामुळे वरवडे इंग्लिश मिडीयम स्कूल जवळील पूलानजिक दोन अडीच फूट पाणी साचले होते. श्रावण नदी वाडी येथेही रस्त्यावर पाणी आले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आकेशियाचा वृक्ष रस्त्यावर पडल्याने ड्यूटी संपवून घरी जाणारया शासकीय कर्मचारी अडकून पडले होते. याची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलीस कर्मचारी देसाई, सावंत, पाडावे यांच्या सहकार्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सदर वृक्ष हटवून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला होता. नदी वाडी येथे पाण्यात अडकलेल्या वाहनांनाही पोलिसांनी पाण्याबाहेर काढण्यास मदत केली जात होती. उशिरापर्यंत पाणी कमी न झाल्याने रामगड सांडवेमार्गे वाहनचालकांनी कणकवलीला जाण्याचा पर्याय निवडला होता. 

दोडामार्गात मुसळधार 
दोडामार्ग ः तालुक्‍याला आज सकाळपासून मुसळधार पावसाने झोडपले. संततधार पावसामुळे नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. अनेक कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेले होते. खानयाळे येथील पूल पाण्याखाली गेल्याने शिरंगे पुनर्वसन वसाहत आणि खानयाळे येथील ग्रामस्थांचे हाल झाले. बराच काळ पुलावरून पाणी वाहत असल्याने साटेली-भेडशी खानयाळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्‍यात कालपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसभर वीज नसल्याने ग्राहक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. वीज नसली की बीएसएनएलची रेंजही गायब होते. त्यामुळे कालपासून बीएसएनएलच्या ग्राहकांना रेंज मिळत नसल्याने त्यांची गैरसोय झाली. विद्युत वितरण कंपनी आणि बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांकडून मात्र सतत वीज आणि रेंज खंडित होत असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com