पुन्हा झोडपले, माणगाव खोरे संपर्कहीन

heavy rain konkan sindhudurg
heavy rain konkan sindhudurg

वैभववाडी / ओरोस (सिंधुदुर्ग) - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले. संततधारेमुळे जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आला असून अनेक पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे काही मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे.

काही भागातील विज पुरवठा खंडीत झाला आहे; परंतु दोन दिवसानंतर चांगला पाऊस पडत असल्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. 
जिल्ह्यात 3 व 4 जुलैला मुसळधार पाऊस झाला. यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. कुडाळ तालुक्‍यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना देखील घडल्या होत्या; मात्र त्यानंतर गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाच्या हलक्‍या सरी कोसळत होत्या.

काल (ता.6) सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. आज सकाळपासुन तर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. संततधारेमुळे नदीनाल्यांना पुर आला आहे. माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. कणकवली-कुंभवडे मार्गावरील पुलावर पाणी चढल्याने मुख्यरस्ता ते गावठणवाडी रस्त्यावरील वाहतुक बंद आहे. निरूखे पुलावरून देखील पुराचे पाणी वाहत असुन हा मार्ग देखील वाहतुकीस बंद झाला आहे. आचरा-कणकवली मार्गावर पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतुक देखील ठप्प झाली आहे.

याशिवाय अन्य काही मार्गावर पुराचे पाणी आले आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या तालुक्‍यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. सह्याद्रीपट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटरस्त्यांमध्ये किरकोळ दगड पडण्याचे प्रकार असले तरी त्याचा वाहतुकीवर परिणाम झालेला नाही. दरम्यान मुसळधार पावसामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासुन रेंगाळलेल्या भातलावणीने वेग घेतला आहे. पावसाअभावी भातलावणी खोळंबली होती; मात्र काल रात्रीपासुन पाऊस सुरू झाल्यामुळे शेतशिवारे गजबजल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. 

अतिवृष्टीचा इशारा 
जिल्ह्यात 8 ते 11 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय समुद्रात लाटा उसळण्याची शक्‍यता देखील वर्तविली आहे. मालवण ते वसई या समुद्र किनारी 3 ते 4.6 मीटर उंचीच्या तर वेंगुर्ले ते वास्को समुद्रकिनारी 2.9 ते 4.2 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com