Photo : रत्नागिरीतील मंडणगडची 'ही' नदी पात्राबाहेर...

सचिन माळी
Thursday, 6 August 2020

मुसळधार पावसामुळे  जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

मंडणगड : दोन दिवसापासून तालुका परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. भारजा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दोन दिवसांत परिसरात मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे या तीन मोजणी केंद्रात ९०२ मिमी पाऊस झाला आहे. ५ ऑगस्ट पर्यँत तालुक्यात एकूण २१६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीप्रमाणे  चिंचघर मांदिवली पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. टाकडे येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे  जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणथळ खलाट्या पाण्यात दिसेनाशा झाल्या आहेत.

हेही वाचा - मुसळधारेमुळे दाणादाण; ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचले मुक्या जनावरांचे प्राण...

भौगोलिक रचना डोंगराळ असलेल्या मंडणगड तालुका उंच व सखल भागांनी व्यापला आहे. भोळवली येथील धरण परिसरात भारजा नदीचा उगम होतो. हे धरण बारमाही भरलेले असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असतो. परिसरात पिंपळगाव, लाटवन, कादवन, विन्हे, तिडे, तळेघर अशी अनेक गावे येतात. कुंबळे, पालघरपर्यंत या परिसरात पाणी साचले आहे. बामणघर, बोरघर, माहू, नारगोली दरम्यानच्या नदीपात्राची लांबी विस्तारली  आहे.

 

तुळशी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ओढ्याद्वारे भारजेला मिळतो. आंबवणे खुर्द, वडवली, कोन्हवली, आतले, उन्हवरे, शेवरे या गावातील पाणी भारजा नदीत मिसळल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. सुमारे ४० किमीचा प्रवास कलेल्या भारजा नदीने शेवरे आणि चिंचघर दरम्यान धोक्याची पातळी गाठली आहे. पाणी प्रचंड वेगाने खाडीला मिळत आहे. परिणामी समुद्राला भरती आल्याने भारजेचे व खाडीचे पाणी पसरत आहे.  त्यामुळे चिंचघर, शेवरे गावाची उपजीविका असणारी भातशेती पाण्याखाली गेली.

हे ही वाचा -  तेरेखोलच्या रौद्ररूपाने हाहाकार; व्यापाऱ्यांची उडाली एकच तारांबळ...

तुळशी घाटात माती रस्त्यावर; वाहतुकीला अडथळा

मंडणगडात तुळशी मार्गावर पावसात खोदलेल्या चरांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचा भराव आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दुचाकी घसरण्याच्या घटना घडत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. 

नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

मंडणगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. निसर्ग चक्री वादळाचा वाईट अनुभव नागरिकांच्या मनात  ताजा असल्याने जोराने वाहणारे वारे भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in ratnagiri mandangad road blocked