सिंधुदुर्गात पावसाची दमदार दौड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मॉन्सूनने गतवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार सुरवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पाऊस 1 हजार मिलिमीटरने पुढे आहे. नुकसानसत्र मात्र सुरू असून, आत्तापर्यंत 7 लाख 28 हजार 403 रुपयांची हानी झाली. पावसामुळे दोघांना प्राणही गमवावे लागले, तर एका दांपत्याचा भिंत पडून मृत्यू झाला.

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात मॉन्सूनने गतवर्षीच्या तुलनेत यंदा दमदार सुरवात केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पाऊस 1 हजार मिलिमीटरने पुढे आहे. नुकसानसत्र मात्र सुरू असून, आत्तापर्यंत 7 लाख 28 हजार 403 रुपयांची हानी झाली. पावसामुळे दोघांना प्राणही गमवावे लागले, तर एका दांपत्याचा भिंत पडून मृत्यू झाला.

जिल्ह्यात दरवर्षी 7 जूनपर्यंत दाखल होणारा मॉन्सून यंदा उशिराने दाखल झाला. सुरवातीस शेतकरी चिंताग्रस्त होता. उशिरा, तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, यामुळे पाऊस कमी पडेल, अशी भीती व्यक्त होत होती; मात्र तुरळक पडणाऱ्या पावसाने चार दिवसांपूर्वी अचानक जोर धरला. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे. शेतीस पुरेपूर पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. त्याने लावणीच्या कामाला सुरवातच केली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 86.33 च्या सरासरीने 697.60 मिलिमीटर तर आतापर्यंत 918.63 च्या सरासरीने 7349 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग 61 (793), सावंतवाडी 116 (828), वेंगुर्ले 88.60 (982), कुडाळ 79 (890), मालवण 71 (1357), कणकवली 82 (754), देवगड 106 (1199), वैभववाडी 87 (546) मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसाने गतवर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. गतवर्षी आजअखेर जिल्ह्यात 802.57 च्या सरासरीने 6420 मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा आजपर्यंत 918.63 च्या सरासरीने 7349 मिलिमीटर पाऊस पडला आहे. दोन्ही वर्षांची तुलना पाहता गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी 1 हजार मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे.
वादळी पावसामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी मालमत्ता मिळून 7 लाख 28 हजार 403 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. हा आकडा प्रत्यक्षात मोठा असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत सावंतवाडी तालुक्‍यातील 17 घरांची पडझड, कुडाळ 4, देवगड 5, दोडामार्ग 4, वेंगुर्ले 9 अशा 32 घरांचे अंशतः नुकसान झाले. त्याची नुकसानीची आकडेवारी 5 लाख 38 हजार 53 रुपये, कणकवलीतील 3 गोठ्यांचे अंशतः मिळून 21 हजार 650 रुपयांचे नुकसान झाले. 11 ठिकाणची खासगी मालमत्ता बाधित झाली असून, 1 लाख 68 हजार 700 रुपयांचे नुकसान झाले आहे. कणकवली तालुक्‍यातील एका जनावराचा वीज पडून मृत्यू झाला. त्याबद्दल शेतकऱ्याला 28 हजार रुपये देण्यात आले आहेत.

वीज पडून कणकवली तालुक्‍यातील एकाचा मृत्यू झाला होता, तर दोडामार्ग येथील व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. दोडामार्गमधील भिंत पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मालवण, देवगडमध्ये सर्वाधिक झोड
मालवण व देवगड तालुक्‍यांनी पावसाचा हजाराचा टप्पा पार केला आहे. मालवणमध्ये आतापर्यंत 1257 मिलिमीटर, तर देवगडमध्ये 1199 मिलिमीटर पाऊस पडला आहे. वैभववाडी तालुक्‍यात 546 मिलिमीटर इतका सर्वांत कमी पाऊस पडला आहे.

Web Title: Heavy rainfall in Kokan