आंबोलीतील "कारवी' फुलांना अतिवृष्टीचा फटका 

नीलेश मोरजकर
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

आंबोली - पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. आंबोलीच्या पावसाळी सौंदर्याला नवीन झळाळी आणणाऱ्या व दर सात वर्षांनी फुलणाऱ्या "कारवी' फुलांना या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

आंबोली - पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानफुलांचा बहर सुरू होतो. आंबोलीच्या पावसाळी सौंदर्याला नवीन झळाळी आणणाऱ्या व दर सात वर्षांनी फुलणाऱ्या "कारवी' फुलांना या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

दरवर्षी आंबोलीचा परिसर या निळ्या-जांभळ्या रानफुलांनी बहरत असतो. कारवीच्या अनोख्या सौंदर्याचा नजारा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची पाऊले आंबोलीकडे वळतात. 
अतिवृष्टीमुळे या वर्षी कमी प्रमाणात फुले फुलल्याने याचा परिणाम पर्यटनावर देखील झाला आहे. नैसर्गिक वैविद्यतेने नटलेल्या पश्‍चिम घाटात फुलांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात. अशाच वैविध्यपूर्ण फुलांपैकी "कारवी' ही फुलांची प्रजाती आहे.

आंबोलीच्या माळरानावर साधारणतः ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात या कारवीच्या फुलांचा बहर असतो. या फुलांना टोपली कारवी किंवा माळ कारवी म्हणतात. या कारवींचे आयुष्य हे आठ वर्षांचे असते. पहिली सहा वर्षे कारवीची केवळ झुडपेच असतात. सातव्या वर्षी ऑगस्ट - सप्टेंबरच्या दरम्यान कारवीची फुले फुलतात. या फुलांच्या मागे फळे येतात. आठव्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला फळे फुटतात आणि कारवीच्या जीवनाचे एक चक्र पूर्ण होते. पडलेल्या फळांमधील बिया पुन्हा रुजतात आणि दुसरे जीवनचक्र सुरू होते. 

दरवर्षी आंबोलीत कावळेसाद पॉईंटवर जाणाऱ्या रस्त्यावर व आंबोली - आजरा रस्त्यावर व चौकुळ - शिरगावकर पॉईंट येथील डोंगर उतारावर कारवीच्या झुडपांना मोठ्या प्रमाणात फुले येतात. कारवी या प्रवर्गात चार ते पाच जाती असून प्रत्येक कारवींच्या फुलण्याची वर्षे ही वेगवेगळी असतात. "व्ह्यायटी' हा प्रकार दर सात वर्षांनी फुलतो. आकरा याला दर चार वर्षांनी तर खरवर हा प्रकार तब्बल 16 वर्षांनी फुलतो. या जातीची फुले पाचगणी परिसरात आढळतात.

या फुलांमधील मध विशेष प्रसिद्ध आहे. त्यामुळे या फुलांकडे मध शोषणारे कीटकही आकर्षित होतात. आंबोलीतील सृष्टीचे हे विलोभनीय दृश्‍य महाराष्ट्रातील पर्यटकांचा आकर्षणबिंदू ठरत आहे. आंबोलीतून प्रवास करणारे पर्यटक हे हमखास थांबून हे सृष्टीसौंदर्य डोळ्यात साठवून घेत. 

वनस्पतीवर संशोधन 
डोंगर उतारावर कारवी बहरत असल्याने संपूर्ण डोंगराला निळे आच्छादन घातल्याचा भास होतो. आंबोली पठारावर ही वनस्पती दाटीवाटीने उगवते. प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ज्ञ रीची व तालबोट यांनी या टोपली कारविवर संशोधन केले असून ती दर सात वर्षांनी फुलते, अशी नोंद केली आहे. पर्यावरणदृष्ट्या ही वनस्पती महत्त्वाची आहे. याची मुळे खोल जमिनीत पसरत असल्याने व दाटीवाटीने उगवत असल्याने उतारावरील जमिनीची धूप या कारवीमुळे रोखली जाते. 
 
वनस्पतीची कळी कुजली 
या वर्षी आंबोलीला अतिवृष्टीचा फटका बसल्याने याचा परिणाम कारवींच्या झाडांवर देखील झाला आहे. पावसाचे प्रमाण हे सातत्याने असल्याने कारवी वनस्पतीची कळी कुजली आहे. त्यामुळे यावर्षी या फुलांचे फुलण्याचे प्रमाण हे केवळ 30 टक्केच आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains affects karvi flowers in Amboli ghat