निसर्गाने हिरावल्याने तरूणांसमोर उरला 'हा' पर्याय

Heavy Rains Affects Vetore Village Economy
Heavy Rains Affects Vetore Village Economy

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग ) : भाजीपाल्यांवरच अर्थकारण अवलंबून असलेल्या वेतोरे गावातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः निसर्गाने हिरावुन घेतला. सुमारे साडेपाच कोटीची उलाढाल या गावातून विविध पिकांच्या माध्यमातून होते. सध्या तेथील कृषी अर्थकारणच संकटात आले आहे. सिंधुदुर्गसह गोव्यातील काही बाजारपेठांची भाजीपाल्यांची गरज भागविणारा वेतोरेतील शेतकरी सध्या वेगळ्यांच विवंचनेत सापडला आहे. निसर्गाची अवकृपा झालीच; परंतु त्यापेक्षा अधिक क्रुर चेष्टा सरकारकडुन सुरू असल्याचे येथील तरूण शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यातील तरूण नोकरीच्या शोधात मुंबई, पुणे, गोवा किंवा अन्य शहरांच्या दिशेने धावत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे; परंतु त्याला छेद देणारे गाव म्हणुन वेतोरे होय. येथील तरूणांनी जिल्ह्यासमोर एक वेगळा आदर्श घातला. उत्तम व्यवस्थापन, कष्ट करण्याची तयारी, अभ्यासवृत्ती आणि नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती असली तर शेतीतुन समृध्द गाठता येते हे येथील तरूणांनी सिध्द केले आहे.

गावातील 80 टक्के तरूण शेतीतुन समृध्दीकडे

गाव परिसर आणि आजुबाजुच्या बाजारपेठांची गरज ओळखुन या गावातील 80 टक्के तरूणांनी खरीप हंगामात चिबुड, दोडका, मिरची, वाली, भेंडी, गवार, काकडी, कारले व अन्य भाजीपाला पिके घेत शेतीतुन समृध्दीकडे वाटचाल करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू केला होता. या गावात चिबुड पिकांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गावातील 60 हेक्‍टर क्षेत्र निव्वळ चिबुड पिकांखाली आहे. त्यातुन सुमारे 1 कोटी 80 लाखांची उलाढाल होते. याशिवाय अन्य पिकांतुन साधारणे 2 कोटी 26 लाख रूपयांची सरासरी उलाढाल होते.

वेतोरे  बनले भाजीपाल्याचे हब 

कणगर पीकांतुन मोठी उलाढाल होते. आजुबाजुच्या गावातील बाजारपेठासह जिल्हा आणि गोव्यात देखील या गावातील भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. भाजीपाल्यातुन चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे भाजीपाला करणाऱ्या तरूण शेतकऱ्यांची संख्या देखील वर्षागणीक वाढत गेली. वेतोरे अल्पावधीत भाजीपाल्याचे हब बनले. फक्त खरीप हंगामात या गावातील भाजीपाला पिकांपासुन आर्थीक उलाढाल साडेपाच कोटीच्या घरात आहे; परंतु यावर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये देखील पावसाने दाणादाण उडविली. याचा सर्वाधीक फटका भाजीपाल्यावरच अर्थकारण असलेल्या वेतोरे गावाला बसला.

हेक्‍टरी 18 हजार रूपये नुकसान भरपाईचे आश्‍वासन

गावातील सर्वाधीक क्षेत्र असलेले चिबुड पिकाचे पुर्णतः नुकसान झाले. दोडका, कारले, वाली, भेंडी ही पिके कुजुन गेली. शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले; परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे यश आले नाही. अखेर संपुर्ण खरीपच हातातुन निसटला. जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी वेतोरे गावात जात शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. हेक्‍टरी 18 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले. चिबुड सारख्या पिकांचा अंतर्भाव देखील नुकसानभरपाईच्या पिकांत केला जाईल असेही सांगीतले. त्यानंतर माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. त्यांनी कृषीमंत्र्याप्रमाणे आश्‍वासने दिलीत; परंतु आजमितीस कोणत्याही शेतकऱ्यांला नुकसानभरपाई मिळाली नाही. गावातील 80 टक्के शेतकऱ्यांचे अर्थकारणच भाजीपाल्यावरच अवलंबुन असल्यामुळे सगळ गावच आता आर्थीक संकटात सापडले आहे. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्‍न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. अनेकांनी तर कर्ज काढुन शेती केली होती. त्यांना कर्जबाजारीपणाला सामोरे लागणार आहे. 

आत्महत्याही येथे घडतील

कोकणातील शेतकरी आत्महत्या करीत नाही हे वास्तव आहे; परंतु यावर्षीसारखी निसर्गाची अवकृपा झाली आणि सरकारने त्याचपध्दतीने शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली तर मात्र आर्थीक संकटात सापडलेला कोकणातील शेतकरीही आत्महत्या करेल. 
- सुशांत नाईक, शेतकरी वेतोरे 

शेतकरी आर्थीक संकटात

अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकवतो. यावर्षी मी दोन हेक्‍टरवर मिश्रशेती केली होती; परंतु त्या सर्व शेतीचे पुर्णतः नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे केले; पण अजुन आमच्या पदरात काहीही पडलेले नाही. त्यामुळे आम्ही सर्वच शेतकरी आर्थीक संकटात सापडलो आहेत. 
- प्रसाद गावडे, शेतकरी, वेतोरे 

आमच्यावरच उपासमारीची वेळ

वेतोरेतील 80 तरूण शेतीतच काम करतात. अनेक गावांची भाजीपाल्याची भुक भागवितात; परंतु आता आमच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. दीड हेक्‍टर क्षेत्रावरील कणगर पीक वाया गेले आहे. या पिकातून वर्षभराची गुजराण होते. 
- उत्तम वालावलकर, शेतकरी, वेतोरे 

नुकसानभरपाईची प्रतिक्षा

वेतोरेतील भाजीपाला पिकांचे जुलै, ऑगस्टच्या अतिवृष्टीत नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शासनाकडे पाठविले होते; परंतु अद्याप नुकसानभरपाई आलेली नाही. आता शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली आहे. 
- एम. बी. मराठे, तालुका प्रभारी कृषी अधिकारी, वेंगुर्ले  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com