#KonkanRains वैभववाडी : उंबर्डेतील एक जण गेला वाहुन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

वैभववाडी - मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उंबर्डेतील महेंद्र धाकला कदम हे पुराच्या पाण्यातुन वाहुन गेले आहेत. तालुक्‍याला जोडणाऱ्या बहुतांशी मार्गावरील वाहतुक पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाली आहे. नापणे येथील विष्णु जैतापकर यांच्या घरात पुराचे पाणी घुसले आहे. पुरस्थिती गंभीर असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

वैभववाडी - मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उंबर्डेतील महेंद्र धाकला कदम हे पुराच्या पाण्यातुन वाहुन गेले आहेत. तालुक्‍याला जोडणाऱ्या बहुतांशी मार्गावरील वाहतुक पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाली आहे. नापणे येथील विष्णु जैतापकर यांच्या घरात पुराचे पाणी घुसले आहे. पुरस्थिती गंभीर असल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तालुक्‍यात गेल्या तीन दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसात आज आणखीणच वाढ झाली आहे. सकाळपासुन तालुक्‍यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. उंबर्डे येथील महेंद्र कदम आणि काशिनाथ कदम हे दोघांना कॉजवेवरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहुन गेले. यातील काशिनाथ याने एका झाडाच्या फांदीला पकडुन स्वतःचा जीव वाचविला; मात्र महेंद्र हा पुराच्या पाण्यातुन वाहुन गेला. त्याचा शोध घेण्याचे काम आपत्ती व्यवस्थापनाकडुन सुरू आहे.

दरम्यान तालुक्‍यातील पुरस्थिती गंभीर बनत चालली आहे.
वैभववाडी उंबर्डे मार्गावरील एडगाव, सोनाळी आणि कुसुर येथे पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली तर वैभववाडी- फोंडा मार्गावरील शिवगंगा नदीच्य कॉजवेवरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक देखील ठप्प झाली आहे. खारेपाटण- गगनबावडा मार्गावरील जामदा पुलावरून देखील पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे हा मार्ग देखील वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातुन अनेक मार्गावर पुराचे पाणी आहे. त्यामुळे अनेक गावांशी तालुक्‍यांशी असलेला सपंर्क तुटला आहे. मुख्य मार्गावर जागोजागी वाहने उभी असुन वाहनचालक पाणी ओसरण्याची वाट बघत आहेत.

एडगाव फौजदारवाडी येथे रस्त्यावर झाड व मातीचा ढिगारा कोसळला आहे. त्यामुळे येथील लोकांचा सपंर्क तुटला आहे. शुक आणि शांती नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली असुन त्याचा फटका नापणे गावाला बसला आहे.नापणे वस्तीत पाणी घुसु लागले आहे. नापणेतील विष्णू जैतापकर यांच्या घरात पाणी घुसले असुन जैतापकर कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

मुसळधार पाऊसासोबत जोरदार वारेदेखील वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे प्रकार सुरू आहेत. कुसुर येथे आज सकाळी रस्त्यावर झाड कोसळले. हे वीजवाहीन्यावर कोसळल्यामुळे विजखांबाचे नुकसान झाले आहे. पुरस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक मार्गावरील एसटी बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. पावसामुळे अनेक मार्गावर शुकशुकाट दिसुन येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Sindhudurg District Vaibhavwadi

टॅग्स