वेंगुर्ला तालुक्यात मुसळधार पाऊस; शिरोडा बाजारपेठेत पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

  • वेंगुर्ला तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा झाेडपले.
  • गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस
  • तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांवर पाणी
  • शिरोडा बाजारपेठेला पाण्याने वेढले. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून दुकानंदारांचे नुकसान

 

वेंगुर्ला - तालुक्याला मुसळधार पावसाने पुन्हा झाेडपले. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पावसामुळे बऱ्याच रस्त्यांवर पाणी आले. शिरोडा बाजारपेठेला पाण्याने वेढल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. यात दुकानंदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ग्रामीण भागात शेतीमध्ये पाणी घुसून अनेक शेतकऱ्यांच्या भात शेतीचेही नुकसान झाले आहे. 

गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात पाणीच पाणी झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण झाला. पावसामुळे नदी - नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत असल्याने ओहोळाचे पाणी शेतीत घुसून भातशेतीचेही नुकसान झाल्याची घटना काही ठिकाणी घडल्या आहेत तर केळूस पुलावरही पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

शिरोडा येथील प्रशांत पुंडलिक मराठे यांच्या सायबर कॅफेमध्ये पावसाचे पाणी शिरून एक लॅपटॉप, दोन संगणक सीपीयू, प्रिंटर, नेट मॉडेम, लाकडी फर्निचर कपाट असे मिळुन सुमारे १ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. सिद्धेश विलास निखार्गे यांच्या कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमध्ये पाणी शिरून १२ संगणक सीपीयू, फ्लोरींग कार्पेट, प्लायवूड असे मिळुन ५ लाख ४४ हजारांचे नुकसान झाले. तर येथीलच काकतकर फोटो स्टुडिओ व भवानी क्लाॅथ सेंटरमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच रवी पेडणेकर, तलाठी श्री गोरड, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, दिलीप गावडे यांनी नुकसानीची पाहणी केली. दरम्यान दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains in Vengurla Taluka flood water enters in Shiroda Market