"महा'वादळाच्या प्रभावाने दर्या खवळलेलाच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

हवामान खात्याने किनारपट्टी भागात विजांसह मुसळधार पाऊस कोसळेल. मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करत दक्षतेच्या सूचना दिल्या.

मालवण - क्‍यार चक्रीवादळानंतर नव्याने सक्रिय झालेल्या महाचक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याच्या किनारपट्टीवर जाणवत आहे. समुद्र पुन्हा खवळला असून लाटांचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मच्छीमारांनी नौका कोळंब तसेच अन्य खाडीपात्रात सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत तर काहींनी समुद्रातून बाहेर काढल्या आहेत. दिवाळी सुटीत येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या पर्यटकांचा खराब वातावरणामुळे हिरमोड झाला आहे. किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवल्याने पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन घ्यावे लागले. 

क्‍यार चक्रीवादळाने किनारपट्टी भागात हाहाकार उडविला. यात मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे वादळ निवळल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला खरा; पण दोनच दिवसात पुन्हा नव्याने महाचक्रीवादळ सक्रिय झाल्याने किनारपट्टी भागात पुन्हा सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

हवामान खात्याने किनारपट्टी भागात विजांसह मुसळधार पाऊस कोसळेल. मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करत दक्षतेच्या सूचना दिल्या. या पार्श्‍वभूमीवर अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका कोळंब, तळाशील येथील खाडीपात्रात हलविल्या तर येथील बंदरातील अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रातून बाहेर काढल्या आहेत. 

दिवाळीतील दोन दिवसातील वातावरण चांगले होते. त्यामुळे येथे राज्याच्या विविध भागातून काही प्रमाणात पर्यटक दाखल झाले. कालच्या दिवसात समुद्र शांत असल्याने स्कूबा, स्नॉर्कलिंग, वॉटरस्पोर्टस्‌ आदी क्रीडा प्रकार सुरू होते. सिंधुदुर्ग किल्ला दर्शनही सुरू होते. दोन दिवसांच्या या काळात सुमारे दोन हजाराहून अधिक पर्यटकांनी किल्ले दर्शनाचा लाभ घेतला.

मात्र आज सकाळपासून समुद्र खवळला होता. लाटांचा वेगही वाढला होता. खराब हवामानामुळे किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवावी लागली. परिणामी जेटीवर किल्ला दर्शनास जाणाऱ्या शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला. वातावरण निवळण्याची प्रतीक्षा पर्यटकांना करावी लागली. समुद्र खवळलेलाच राहिल्याने पर्यटकांना जेटीवरूनच किल्ले दर्शन करावे लागले. 

काल रात्री विजांसह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. आज सकाळच्या सत्रातही किरकोळ पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी कडक ऊन पडले होते. समुद्र खवळलेला असल्याने जलक्रीडा, किल्ला प्रवासी वाहतूक सायंकाळपर्यत बंद होती. मासेमारीही ठप्प होती. 

देवगड बंदर नौकांनी भरले 

देवगड - अरबी समुद्रातील महाचक्रीवादळाच्या भीतीने सर्वांर्थाने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येथील बंदरात बाहेरील नौकांचे "इनकमिंग' सुरू झाले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील अन्य बंदरातील नौकांसह परराज्यातील नौका आश्रयाला येत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा बंदर नौकांनी भरले असून मच्छीमारी व्यवसायात व्यत्यय आला आहे. दरम्यान, किनारपट्टीवर वेगाने वारे वाहू लागले आहेत. 

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गुरुवारपासून (ता. 31) काळे ढग दाटून वातावरण पुन्हा पालटले आहे. त्यातच मध्यरात्रीपासून किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढला होता. समुद्री वादळाच्या शक्‍यतेने सर्वार्थाने सुरक्षित असलेल्या येथील नैसर्गिक बंदरात नौकांचे "इनकमिंग' सुरू झाले. रात्री बारापासून परराज्यातील ट्रॉलर आश्रयाला येत होते. सकाळी येथे हलका पाऊस झाला. दिवसभरात अधूनमधून पावसाळी वातावरण तयार होत होते. दिवसभर किनारपट्टीवर वादळी वारा सुरू होता. वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्‍यतेने स्थानिक मासेमारीही ठप्प झाल्याचे दिसत होते. 

नुकतेच अरबी समुद्रात आलेल्या "क्‍यार' वादळामुळे मच्छीमारांसह शेतकरी अडचणीत आले. त्यावेळी जोराच्या वादळी पावसाने किनारपट्टीला झोडपून काढले. जोराच्या पावसावेळी बाहेरील नौका येथील बंदरात आश्रयाला आल्या होत्या. त्यावेळीही मासेमारी विस्कळित झाली होती. याला काही दिवस होताच पुन्हा "महा' चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. 

पर्यटन हंगाम अडचणीत 

ऐन दिवाळीच्या तोंडावर अरबी समुद्रात आलेल्या "क्‍यार' वादळाने किनारपट्टीला पावसाने झोडपले. यामुळे स्थानिक बाजारपेठेतील उलाढालीवर त्याचा परिणाम जाणवला. आता दिवाळी सुटीत पर्यटन हंगाम बहरण्याची शक्‍यता असताना पुन्हा महाचक्रीवादळाचे पडसाद उमटले. यामुळे मासेमारी हंगाम विस्कळित झाल्याने पर्यटन हंगाम अडचणीत जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Waves In Sindhudurg Due To Maha Cyclone