मदत मिळताच `त्या` तान्हुल्याच्या कुुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण

अजय सावंत
Sunday, 30 August 2020

तालुक्‍यातील पिंगुळी-गुढीपुर येथील अनंत ऊर्फ उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या मुलाच्या दोन्ही किडन्याना ब्लॉकेज आहेत. या मुलाचे पुढील उपचार करण्यासाठी 2 लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व अचानक भजन मंडळ यांच्यावतीने उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या तान्हुल्याच्या उपचारासाठी 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. 

तालुक्‍यातील पिंगुळी-गुढीपुर येथील अनंत ऊर्फ उमेश आटक यांच्या अवघ्या वीस दिवसांच्या मुलाच्या दोन्ही किडन्याना ब्लॉकेज आहेत. या मुलाचे पुढील उपचार करण्यासाठी 2 लाख रूपये एवढा खर्च अपेक्षित आहे. श्री. आटक यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ते एवढा खर्च पेलू शकत नाहीत. यामुळे दानशूर व्यक्ती, संस्था, एनजीओ यांनी या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन केले होते.

या मुलाच्या शस्त्रक्रियेकरिता मदतीसाठी केलेल्या आवाहनाप्रमाणे गुरुवारी (ता.27) सायंकाळी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान व अचानक भजन मंडळ यांच्यावतीने 25 हजार रुपयांची मदत करण्यात आली. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, राजन नाईक, विशाल देसाई, प्रणय तेली, कमलेश पाटकर, प्रसाद नाईक, केदार सामंत, अविनाश वालावलकर, प्रसाद पडते, महेंद्र बांदेकर, सर्वेश वर्दम यांनी श्री. आटक यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अजय आकेरकर, अण्णा रणसिंग, रणजित रणसिंग, अमित गंगावणे, प्रसन्न गंगावणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: help from ngo for a baby treatment konkan sindhudurg