विश्‍वासाच्या बळावर ‘तो’ करतोय अंधाराशी दोन हात

विश्‍वासाच्या बळावर ‘तो’ करतोय अंधाराशी दोन हात

राजेश मुळीकचा संघर्ष - दृष्टी गमावलेल्या तरुणास द्यायला हवे पाठबळ
सावंतवाडी - कमावण्याच्या, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याच्या वयातच दृष्टीने दगा दिला. आयुष्य अंधकारमय बनले. पुन्हा प्रकाश पाहण्यासाठी गेल्या पाच वर्षात खूप संघर्ष केला; पण आता नेहमीच उपचार करायलाही पैशाची कमतरता जाणवतेच. एक दिवस दृष्टी परत येईल, असा विश्‍वास आहे; पण तो दिवस येईपर्यंत जगण्याचा संघर्ष करायचा कसा हा प्रश्‍न मात्र ओटवणे येथील रोजेश मुळीक यांना पडला आहे.

ओटवणे गावठणवाडी येथील राजेश मुळीक गावातील मित्रात हसत खेळत जीवन जगण्याचा त्याचा दिनक्रम ठरलेला असे. तेव्हा त्याचे २५ वर्ष वय. राजेशला अचानक एक दिवस डोळे येण्याचा आजार झाला. या किरकोळ आजाराची स्वरुप एवढे मोठे रुप धारण करेल की एक दिवस त्याला आपली दृष्टीच गमवावी लागेल याची किंचित; कल्पनाही राजेशला किंवा त्याच्या कुटुंबीयांना नव्हती. ऐन तारुण्यातच दृष्टी गेल्यामुळे राजेश खचत गेला.

खासगी डॉक्‍टरकडे उपचार होऊ न शकल्यामुळे अखेर सावंतवाडी शहरात यावे लागले. तेथून कुडाळ. कुडाळमधील डॉक्‍टरांनी गोवा बांबुळीचा पर्याय दिला. डॉक्‍टरांनी त्याच्या डोळ्यांना स्टीव्हन जॉन्सन नामक आजार झाल्यामुळे डोळे गेल्याचे सांगितले. त्याच्या डोळ्यांना दृष्टी येईल या आशेपुढे प्रत्येक डॉक्‍टरनेही हात टेकले. यात त्याच्या कुटुंबीयांची बरीच फरकट होत होती. विशेषतः एकीकडे मन खचले असताना शेवट आशा असेपर्यंत आपल्या मुलाला सर्व उपचार देण्याची तयारी राजेशच्या वडिलांनी म्हणजेच तुकाराम मुळीक यांनी ठेवली. कुडाळ नंतर कोल्हापूर तेथून म्हापसा त्यानंतर मुंबई असा प्रवास करावा लागला. मुंबई सारखे जगातील मोठे शहर गाठल्यावर डोळ्यांच्या दृष्टीबाबत मोठी आशा निर्माण झाली होती; मात्र तरीही पदरी निराशाच दिसू लागली. तेथील डॉ. निखिल वागळे यांनी पुढील उपचारासाठी चेन्नईच्या आय हॉस्पिटल म्हणजेच ‘शंकरा नेत्रालय’ चा सल्ला दिला. 

चेन्नईतील डॉक्‍टरांनी डोळ्यांना दृष्टी कधीच न येण्याच्या सल्ल्याला पुष्टी दिली; मात्र डोळ्यांच्या आर्तंपटलावरील ओलावा कायम राहावा यासाठी औषधोपचार कायम ठेवावा लागणार असल्याचे सांगितले. मानवी उपाय निकृष्ट ठरले तरी राजेशच्या वडिलांना कोणतातरी चमत्कार होवून दृष्टी येईल, असा विश्‍वास आहे. डोळ्यांच्या आंर्तपटलावर ओलावा राहणे आवश्‍यक असल्याने नेत्रदान केलेले डोळेही बसविणे शक्‍य नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर हतबल कुटूंबियांची आभाळ फाटल्यागत परिस्थिती झाली. येत्या आठ जूनला राजेशला दृष्टी गमावून ५ वर्षे पुर्ण होत आहेत. तर सद्यस्थितीत औषधोपचार कायम सुरू ठेवावा लागत आहे. घरातली आर्थिक बाजूही कमकुवत असल्याने औषधोपचारासाठी लागणारा खर्च हा आवाक्‍याबाहेरचा आहे. महिन्याला साधारणतः पाच ते सहा हजार रुपये अगदी छोट्या ड्रॉप्सना लागत आहे. सहा महिन्यांनी दादर येथे तपासणीसाठी जावे लागत आहे. राजेशचा भाऊ टेम्पोवर ड्रायव्हर आहे. तर वडील किरकोळ कामे करत असतात. दृष्टी जावून मुलाला पाच वर्षे झाली तरी अजूनही आपला विश्‍वास असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

मदतीसाठी आवाहन
औषधोपचारासाठी मदत करावयाची असल्यास बॅंक ऑफ इंडीयाच्या ओटवणे शाखेच्या १४७३१०११००००७९८ या खातेक्रमांकावर मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. आयएफसी कोड बीकेआयडी BKID०००१४७३ हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com