वेळप्रसंगी कुडाळ तहसीलदारांची स्वखर्चातून मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

विशेष म्हणजे येथील तहसीलदार नाचनकर व त्यांची सर्व टीम सामाजिक बांधीलकेतून सर्वसामान्य गरजूंच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कोरोना विषाणू पार्श्‍वभूमीवर गरजूंना मदतीसाठी सातत्याने कार्यरत असणारे येथील तहसीलदार आर. व्ही. नाचणकर व त्यांची सर्व टीम देवदूत बनली आहे. स्वतः श्री. नाचनकर हे गरजूंच्या ठिकाणी जाऊन विविध संस्थांनी दिलेली मदत तत्काळ पोच करीत आहेत. 

आपल्या देशावर राज्यावर कोरोनाचे फार मोठे संकट आहे. याची खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, डॉ. चाकूरकर यांच्यासह सर्व प्रशासन सतर्क झाले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी ही सर्व यंत्रणा कार्यरत आहे. कुडाळ तालुक्‍याचा विचार करता तहसील पोलीस यंत्रणा आपआपल्या परीने अतिशय चांगले काम करीत आहे. विशेष म्हणजे येथील तहसीलदार नाचनकर व त्यांची सर्व टीम सामाजिक बांधीलकेतून सर्वसामान्य गरजूंच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

गेले दहा दिवस श्री. नाचनकर व त्यांची टीम तालुक्‍यात अणाव, पणदूर, माणगाव, मोरे, माड्याचीवाडी येथील वृद्धाश्रम तसेच जनसामान्यांना सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून विशेष कौतुक केले जात आहे. घटनास्थळी पोचून आढावा घेत आहेत व गरजूंना तशी मदत करत आहेत हे वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. तहसीलदारांनी केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रोटरी क्‍लब, दुर्वाकुर ज्वेलर्सचे मालक आनंद मालवणकर, सुहास मालवणकर, बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर साहित्य देण्यासाठी कार्यरत झाले आहेत. 

वेळप्रसंगी स्वखर्च 
वेळप्रसंगी श्री. नाचणकर यांनी परप्रांतीय इतर भागातून आलेल्या कामगारांना स्वतःच्या पैशाने अन्न दिलेले आहे हे कौतुकास्पद म्हणावे लागेल. पाच दिवसांपूर्वी कणकवलीतुन पंचवीस ते तीस कामगार कुडाळमध्ये अडकले होते. त्यांना कणकवलीत पाठवण्याची जबाबदारी नाचणकर यांनी पार पाडली. त्यांना पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helping needy citizens Kudal Tehsildar