
संशयितांकडून मोटारीसह 430 मिली ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याबाबत हवालदार विजय केरकर यांनी तक्रार दिली असून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गांजा बाळगणाऱ्या कोल्हापूर येथील दोघांना आरोंदा येथे पकडण्यात आले. मुबारक इस्माईल खतीब (वय 54, रा. कोल्हापूर शिवाजी पार्क) व सलीम शरपुद्दीन कापडी (वय 52, रा. कोल्हापूर), अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई काल मध्यरात्री येथील पोलिसांनी केली.
संशयितांकडून मोटारीसह 430 मिली ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. याबाबत हवालदार विजय केरकर यांनी तक्रार दिली असून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की गोव्यावरून कोल्हापूरच्या दिशेने आपल्या गावी दोघेही मोटारीने रात्री बारा वाजता येत होते. ते आरोंदा चेक पोस्टवर आले असता तेथे तैनात पोलिस विजय केरकर व श्री. तेरेखोलकर यांनी मोटारीची झाडाझडती घेतली. यावेळी मागच्या सीटवर गांजा आढळला. यावर पोलिसांनी विचारणा केली असता संबंधित गांजा हा आपण पिण्यासाठी घेतला होता. त्यातील राहिलेला थोडासा सीटवर ठेवल्याचे ते म्हणाले.
430 मिली ग्रॅम एवढे प्रमाण या गांजाचे होते. याबाबतची माहिती येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद यांना देताच हेडकॉन्स्टेबल सिक्वेरा यांच्यासह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोंदा दूरक्षेत्राचे श्री. तेरेखोलकर आणि श्री. केरकर यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. गांजा जप्त करत संबंधित दोघांवरही गुन्हा दाखल केला. हा गांजा तस्करीसाठी वापरला नसल्याची कबुली संशयितांनी दिली.
त्यामुळे पोलिसांकडून अमली पदार्थ सेवनाची कारवाई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्या दोघांना आज दोडामार्ग न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी 15 हजाराचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले हे तालुके गोवा सीमेलगत असून या सीमेवरील काही गावातून रस्ते मार्ग तसेच चोरट्यावाटेने दारूसह इतर अमली पदार्थांचीही तस्करी जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यात होते; मात्र त्यावर अपेक्षित कारवाई होत नाही.
अशी आहे शिक्षेची तरतूद
साधारण 1 किलो गांजाची किंमत 20 ते 25 हजार एवढी असते. सापडलेला गांजा हा एक किलोपेक्षा कमी आहे. एक किलोपेक्षा गांजा कमी असेल तर त्यासाठी सहा महिने कारावासाची तरतूद आहे.
संपादन - राहुल पाटील