रत्नागिरीला हायस्पीडची गस्ती नौका

राजेश कळंबटे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - अनधिकृत मासेमारी, परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी यासह किनारी भागातील कांदळवनांची सुरक्षा लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन चारशे अश्‍वशक्तीची (हायस्पीड) गस्ती नौका मंजूर झाली आहे. त्यातून पोलिस, मत्स्य आणि वन विभागाची संयुक्‍त गस्त होणार आहे.

रत्नागिरी - अनधिकृत मासेमारी, परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी यासह किनारी भागातील कांदळवनांची सुरक्षा लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यासाठी नवीन चारशे अश्‍वशक्तीची (हायस्पीड) गस्ती नौका मंजूर झाली आहे. त्यातून पोलिस, मत्स्य आणि वन विभागाची संयुक्‍त गस्त होणार आहे. यापूर्वी दोनशे अश्‍वशक्तीच्या नौकेतून गस्त घातली जात होती. नवीन नौकेमुळे सुरक्षा मजबूत होणार आहे.

गस्ती नौका भाडे तत्त्वावर घेण्याची प्रक्रिया पुन्हा राबविणार असल्याचे आयुक्‍तस्तरावरुन सांगण्यात आले. प्रतिदिन पंधरा हजार रुपये नौकेसाठी दिले जातात. हा दर कमी असल्यामुळे पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रक्रिया पुन्हा राबविणार असल्याचे समजते.  

रत्नागिरी जिल्ह्याला १६५ किमी समुद्रकिनारा लाभला आहे. या भागात गस्त घालण्यासाठी मत्स्य विभागाची एकमेव गस्ती नौका आहे. गेली तीन ते चार वर्षे अनधिकृत मासेमारी, परराज्यातील मच्छीमारांची घुसखोरी आणि बंदी काळात पर्ससिन नौकांचा धुडगूस याविरोधात पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यात प्रखर दिव्यांच्या झोताचा वापर करून केल्या जाणाऱ्या मासेमारीवर बंदी घालूनही त्याचा वापर होत होता. त्यामुळे मच्छीमारांमध्येच दुहीचे वातावरण होते. सहाय्यक मत्स्यविभागाला सूचना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोचेपर्यंत घुसखोरी करणाऱ्या नौका गायब व्हायच्या. त्यामुळे मत्स्य विभागाला कारवाई करणे अशक्‍य व्हायचे. 

मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी मत्स्यविभागाला दोनशे अश्‍वशक्तीची नौका मिळाली होती. त्यानंतर गस्तीसाठी आणखीन जादा नौका मिळावी असा प्रस्तावही तयार केला होता; परंतु त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या हंगामात कांदळवन संरक्षणांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात चारशे अश्‍वशक्तीची हायस्पीड नौका मंजूर झाली. कांदळवनांवर लक्ष ठेवण्यासाठी या नौकेचा उपयोग केला जाणार आहे. हायस्पीडची नौका ताफ्यात आल्याने आता कारवाईला बळ मिळणार आहे.

गस्ती नौका भाड्याने घेण्याची प्रक्रिया आयुक्‍तस्तरावरुन सुरू आहे. पहिल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- आनंद पालव
, निरीक्षक

Web Title: High speed patrolling Boat for Ratnagiri