चढलेल्या पाऱ्याने तयार कैरी होरपळली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

रत्नागिरी - जिल्ह्यात आणि प्रायशः किनारपट्टीला पारा अभूतपूर्व चढल्याने याआधी कधीही नाही अशी आंब्याची होरपळ झाली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात व त्यानंतर सरासरी तापमानात वाढ होते; मात्र या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच ही वाढ अनुभवायला मिळाली. कमाल व किमान तापमानातील फरकही 16 अंशांपासून ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत झाला. यामुळे आंबा मोहोर गळून व करपून जातो आहे. फलधारणा झाल्यानंतरची कैरीही भाजून निघत आहे. त्याचा परिणाम हंगामातील एकूण उत्पादनावर झाला आहे. 

सर्वसाधारणतः मार्च महिन्यात जाणवणाऱ्या उन्हाळ्याच्या झळा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जाणवत आहेत, त्यामुळे हापूसचे उत्पादन वीस टक्‍के कमी होण्याची शक्‍यता आहे. रत्नागिरी परिसरातील बागायतदारांशी याबाबत चर्चा केली असता देसाई यांनी सांगितले, की वाढलेल्या उष्णतेने झाडांवरील 35 टक्‍के मोहर गळून पडला. यामुळे एप्रिल व मे महिन्यात हाती येणाऱ्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसांत तापमान अचानक वाढले. या वाढत्या उष्णतेने जो मोहर गळून पडला, त्यापासून पुढील दोन महिन्यांत फलधारणा अपेक्षित होती. 

तापमानातील वाढ आणि घट याबाबत बागायतदारांनी सांगितले, की कमाल व किमान तापमानातील 20 अंशांचा हा फरक चिंता वाढवणारा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील वाढत्या तापमानासह ढगाळ वातावरणाने काही बागांमध्ये तुडतुडाही वाढला. कोकणात हळूहळू तापमान वाढत जाते. या वर्षी ते फेब्रुवारीपासून वाढू लागले आहे. हा मोठा बदल दिसतो आहे. 

""35 अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान सहन करण्याची ताकद हापूसमध्ये आहे. सध्या पारा त्यापेक्षाही वर चढत आहे. परिणामी लहान फळे, आंबा भाजून गळू लागला आहे, त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे.'' 

- सचिन लांजेकर, आंबा बागायतदार 

वादळी पावसाची शक्‍यता 

कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट निर्माण करणारे वारे काही प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे येत्या दोन दिवसांत दिलासा मिळणार असला, तरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. पाऊस पडला तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 

Web Title: high temperature in ratnagiri