मालवणात हायस्पीड ट्रॉलर्सची दादागिरी; स्थानिकांना घेरले

मालवणात हायस्पीड ट्रॉलर्सची दादागिरी; स्थानिकांना घेरले

मालवण : निवती रॉकनजीकच्या समुद्रात मासेमारीस गेलेल्या स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या दोन होड्यांना मलपीतील काही हायस्पीड ट्रॉलर्सनी एक तास घेरल्याचा प्रकार घडला. स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांवर ट्रॉलर्स चढविण्याचा त्यांचा हेतू होता; मात्र बऱ्याच वेळानंतर त्या मलपीच्या ट्रॉलर्सनी तेथून जाणे पसंत केले. मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सच्या या दहशतीमुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी अरविंद आचरेकर यांनी येथील पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार आज दिली आहे.

दरम्यान, मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सच्या दहशतीमुळे आता समुद्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मच्छीमार नेते बाबी जोगी यांनी दिला आहे.

दांडी येथील अरविंद आचरेकर हे लिलावती मच्छीमारी नौका घेऊन तुषार आचरेकर, खलाशी चैतन्य तारी, प्रवीण बांदकर यांच्यासह अन्य मच्छीमारांना घेऊन समुद्रात मासेमारीस गेले होते. बुधवारी सकाळी ते निवती रॉक येथे मासेमारीसाठी थांबले असता मलपीतील काही हायस्पीड ट्रॉलर्स त्यांच्या दिशेने आले. यामध्ये संजय जामसंडेकर यांनी टाकलेल्या अँकरच्या दोरीवरून मलपीतील ट्रॉलर गेल्याने आचरेकर यांच्या नौकेतील खलाशांना त्यांना काय करतोस अशी विचारणा केली असता त्या मलपीतील ट्रॉलरधारकाने अन्य दोन मलपीतील ट्रॉलर्संना बोलावून घेत आचरेकर व जामसंडेकर यांच्या दोन्ही होड्यांना घेरले. त्यांना पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना ठोकर देण्याचा उद्देश होता. त्यामुळे भयभीत झालेल्या पारंपरिक मच्छीमारांनी त्यांना काहीही सांगितले नाही. एक तास घेरल्यानंतर मलपीतील तिन्ही हायस्पीड ट्रॉलर्स देवगडच्या दिशेने निघून गेले.

मलपीतील ट्रॉलर्सधारकांच्या दहशतीमुळे आचरेकर व त्यांचे खलाशी भयभीत झाले होते. काल रात्री ते बंदरात परतले तर संजय जामसंडेकर हे आज सर्जेकोट बंदरात परतले. त्यांनी घडलेला हा प्रकार अन्य मच्छीमारांना सांगितल्यानंतर त्यांनी तत्काळ सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयात जात अधिकार्‍यांना माहिती देत कारवाईची मागणी केली; मात्र मत्स्य व्यवसायकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सायंकाळी पारंपरिक मच्छीमारांनी पोलिस ठाणे गाठत या घटनेची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com