महामार्गांवरील बार बंदीच्या आघातातून साकारला ऑर्केस्ट्रा

महामार्गांवरील बार बंदीच्या आघातातून साकारला ऑर्केस्ट्रा

सावंतवाडीच्या सुपुत्राचा प्रयोग - ३० समदुःखी कलावंतांना रोजगाराचा मार्ग; अडचणींवर सकारात्मक मात

सावंतवाडी - महामार्गालगतच्या बारबंदीमुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात लाखो जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यात कोकणवासीयांची संख्या लक्षणीय आहे. याही कठीण स्थितीत एका कलावंताने समदुःखींना एकत्र आणत स्वतःच्या ऑर्केस्ट्राची निर्मिती केली. आपल्याबरोबरच इतरांच्या दुःखावर ‘सुरमय’ फुंकर मारणाऱ्या या कलावंतांचे नाव आहे महेश आरोलकर.

श्री. आरोलकर यांचे येथील सबनिसवाड्यात घर आहे. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण शहरातच झाले. विद्यार्थीदशेत गॅदरिंग, छोटे-मोठे कार्यक्रम यात ते छंद म्हणून गायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी संघर्ष सुरू झाला. येथे नोकरी मिळविण्याचे प्रयत्न हरल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. तेथेही संघर्ष करून सुद्धा नोकरी मिळेना. सोबत आणलेले पैसे संपले. शेवटी नाईलाजाने त्यांनी ठाण्याच्या रेल्वेस्टेशनवर मुक्काम ठोकला. जवळपास १ महिना त्यांनी स्टेशनवरच कसे-बसे दिवस काढले. एक दिवस पोलिस त्यांना संशयित म्हणून पकडून घेऊन गेले. त्या विभागाचे बिटप्रमुख असलेले संजय भिवणकर यांच्या ताब्यात त्यांना देण्यात आले. भिवणकर यांनी त्यांची व्यथा समजून घेतली. त्यांचे छंद विचारले. गायन येत असल्याचे समजताच भिवणकर यांनी त्यांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे बारच्या ऑर्केस्ट्रामध्ये ते गाऊ लागले. पुढे हाच त्यांचा रोजीरोटीचा मार्ग बनला. गायनाच्या माध्यमातून त्यांनी नाव कमावले. सुमारे आठ देशामध्ये बार ऑर्केस्ट्रासाठी ते गायले. संसार रुळावर आला. ठाण्यात घर घेतले.

सर्व सुरळीत चालू असताना महामार्गालगतचे बार बंद करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाने लाखो बार कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोलकर यांच्यासारख्या कलावंतावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. ठाण्यात पाच-साडे पाच महिन्यापूर्वीच या निर्णयाची अंमलबजावणी झाली. एका बारमध्ये सहा ते सात ऑर्केस्ट्रा कलाकार काम करतात. इतरांना कदाचित पर्यायी नोकऱ्या मिळाल्याही असतील, पण या कलाकारांना नोकरीच्या संधी खूपच मर्यादित आहेत. त्यामुळे रोजीरोटीचे साधनच थांबल्याची स्थिती निर्माण झाली. आयुष्यभर संघर्ष बघितलेल्या आरोलकर यांनी यातूनही मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना संपर्क सुरू केला. त्यांचा संच बनवून सुरसंगम म्युझिकल नाईट या ऑर्केस्ट्राची निर्मिती केली. केवळ आपल्यापुरता विचार न करता आणखी तीस समदुःखी कलावंतांना यातून रोजगाराचा मार्ग दाखविला. त्यांच्या या प्रयोगाची सुरवात तरी चांगली झाली आहे. ते लवकरच सुपरस्टार राजेश खन्ना का सफर ही थिम घेऊन कोकण दौरा करणार आहेत. 

कलावंतांच्या कलेची कदर होण्याच्या दृष्टीने शासनकर्त्यांनीही विचार करायला हवा. एका निर्णयाने अनेक कुटुंबांच्या जगण्या-मरण्याशी संबंधित गोष्टींवर आघात होतो. आयुष्यात खूप संघर्ष बघितला, मात्र त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला तर दुःख आणखी हलके होते. आमचाही या सगळ्यामधून असाच प्रयत्न आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात डॉ. जे. बी. नाईक, डॉ. दिनेश पडवळ यांची खूप मदत झाली.
- महेश आरोलकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com