पूल पूर्ण होऊनही धोकादायक प्रवास कायम 

पूल पूर्ण होऊनही धोकादायक प्रवास कायम 

कणकवली - राष्ट्रीय महामार्गावरील नव्या पुलांची बांधकामे पूर्ण झालेली असली तरी प्रशासनातील कागदी घोड्यांमुळे पुलाच्या जोडरस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन अद्याप झालेले नाही. त्यामुळे जागेअभावी पूर्णत्वास गेलेल्या पुलांना मुख्य रस्त्यास जोडण्याची अडचण निर्माण झाली आहे. महामार्गावरील सावित्री नदीच्या पुलांच्या दुर्घटनेनंतरही प्रशासनाचे डोळे अद्याप उघडलेले नसून लोकप्रतिनिधींची अनास्थाही यामुळे चव्हाट्यावर आली आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला पुढील वर्षी सुरवात होणार आहे; मात्र या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील जवळपास 35 पुलांना शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तरीही या पुलांचा पाया ढासळलेला नाही; मात्र गतवर्षी 2 ऑगस्टला महाडजवळच्या सावित्री नदीवरील पुलाचा भाग मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 जणांचा बळी गेला. त्या घटनेने दिल्लीचा तख्तही हादरला होता. या पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर झाले. तेव्हा महामार्गावरील इतर पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले; मात्र ब्रिटिशकालीन गॅगन इंडिया या बांधकाम कंपनीने तत्कालीन पुलांच्या कालमर्यादा संपल्याबाबतची नोटीस सार्वजनिक बांधकामला यापूर्वीच दिली होती. त्यामुळे जून 2014 मध्ये तर काही सप्टेंबर 2014 मध्ये पुलांची भूमिपूजने सरकारच्या प्रधिनिधींनी केली. गेल्या दोन वर्षांत मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटण ते झाराप तिठ्यापर्यंतच्या शंभर किलोमीटर अंतरावरील खारेपाटण, जानवली, कसाल, पिठढवळ, बांबर्डे या पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे; मात्र कसाल व जानवली पुलासाठी जोडरस्ता आवश्‍यक आहे. मातीचा भराव टाकून रस्ता जोडल्यावर या दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू होऊ शकते; मात्र गेल्या सहा महिन्यांपूर्वी पुलांचे बांधकाम होऊनही जोडरस्त्यासाठी लागणारी जमीन महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झालेली नाही.

जमीन वर्ग न झाल्याने काम थांबले 
राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे; मात्र रस्त्यासाठी लागणारी जमीन महसूल विभागाकडून महामार्ग विभागाकडे वर्ग झालेली नाही. अशी माहिती महामार्ग प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता पी. पी. गोसावी यांनी दिली. 

महामार्गावरील शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पुलांची कालमर्यादा संपली आहे. महामार्गावरील बांधण्यात आलेले पूल आणि वर्ष असे - 
* खारेपाटण - 1946 
* पियाळी - 1941 
* बेळणे - 1961 
* जानवली - 1934 
* गडनदी - 1934 
* पिठढवळ - 1957 
* बांबर्डे - 1938 
* भंगसाळ - 1968 
* बांदा - 1958 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com