कुडाळच्या सत्ताधीशांचा संघर्षमय प्रवास 

शिवप्रसाद देसाई
Monday, 25 January 2021

सुरूवातीच्या काळात या प्रांतावर हिंदू राजांचा प्रभाव होता. पुढे विजापूरच्या आदीलशहाने येथे वर्चस्व मिळवले. त्यांनीही कुडाळ परगण्यावर देसाई किंवा देशमुख यांची नियुक्‍ती केली. कुडाळदेशस्थ प्रभू हे इथले देशमूख होते.

सावंतवाडी ः कुडाळ येथून या प्रांताचा कारभार चालायचा हा संदर्भ आधी आलाच आहे. याकाळातील कुडाळ प्रांतामधील कारभार समजून घेण्याचा प्रयत्न या भागातून करूया. कुडाळ प्रांतानेही सत्तासंघर्षाची अनेक रुपे अनुभवली. यात लढाया, संघर्ष, कटकारस्थाने याचाही समावेश आहे. कुडाळ परगण्यावर कुडाळदेशस्थ प्रभू हे देशमूख होते. या सत्ताधीशांनीही अनेक संघर्ष बघितले.  कुडाळ देशाच्या स्थापनेचे संदर्भ आधी आलेच आहेत. सुरूवातीच्या काळात या प्रांतावर हिंदू राजांचा प्रभाव होता. पुढे विजापूरच्या आदीलशहाने येथे वर्चस्व मिळवले. त्यांनीही कुडाळ परगण्यावर देसाई किंवा देशमुख यांची नियुक्‍ती केली. कुडाळदेशस्थ प्रभू हे इथले देशमूख होते. 

पूर्वी कुडाळ देशाचा विस्तार मोठा होता. बहामनी सुलतानाचा सरदार महंमद गवान याने या प्रांतावर हल्ला केल्याचा संदर्भ याआधी आला आहे. त्याने या हल्ल्यात साळशी व पेडणे हे दोन महाल जिंकले. त्यामुळे तो प्रांत कुडाळ देशापासून तुटला. यानंतर येथील देसाईनी स्वतंत्र कारभार सुरू केला. पुढे याच महमद गवान याने कुडाळ देशाच्या उर्वरीत भागाला कुडाळ परगणा, असे नाव देवून त्याचा कारभार वालावलकर देसाईंच्या ताब्यात दिला. या मुलखाचा कारभार सुनियोजित व्हावा यासाठी 12 तर्फा आणि दोन कर्यात असे विभाग करण्यात आले. सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात उल्लेख असलेला कुडाळ परगणा म्हणजे हाच भाग होय. 

आदीलशहाच्या काळात देशमूख म्हणून सत्तेवर असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंचा सोळाव्या शतकापासूनचा थोडाफार इतिहास उपलब्ध आहे. याबाबत त्या काळात "गोमा गणेश पितळी दरवाजा' अशी एक आख्यायिकाही प्रसिद्ध होती. ही आख्यायिका कुडाळदेशस्थ प्रभू घराण्याशी जोडली जाते. या कुळातील गोमा गणेश हे रोजगारासाठी विजापुरात गेले होते. तेथे दरबारात प्रवेशाचा त्यांनी खुप प्रयत्न केला; मात्र यश न आल्याने त्यांनी एक युक्‍ती योजली. गावाच्या वेशीवर छोटीशी पेढी घातली आणि तेथे "गोमा गणेश पितळी दरवाजा' अशा नावाचा एक शिक्‍का बनवून दरबारातून सनदा घेवून जाणाऱ्यांकडून काही मोबदला घेवून त्या सनदेवर हा शिक्‍का मारण्याचे काम सुरू केले. हा प्रकार एकदा दरबारात लक्षात आला. बादशहाला याची माहिती मिळताच त्यानी गोमा गणेश यांना बोलवून आणले. यावेळी त्यांनी बादशहाला दरबारात प्रवेशासाठी केलेल्या प्रयत्नांची हकीगत सांगितली. त्यांच्या चातुर्याने प्रभावीत होवून गोमा गणेश यांना बादशहाने दरबारी ठेवले.

सोळाव्या शतकाच्या प्रारंभाला या घराण्यातील राम प्रभू यांनी काही वर्षे देशमुखी सांभाळली. पुढे गोम प्रभू, त्यानंतर त्यांचे बंधू बाये प्रभू हे सत्तेवर आले. बाये प्रभूंना रामजी आणि गोमजी तर गोम प्रभूंना भानजी असे पुत्र होते. आपल्या पश्‍चात वाद होवू नये म्हणून गोम प्रभू यांनी आपला भाऊ गणेश यांना गादीवर बसवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या मागून भानजी आणि नंतर आपल्या मुलांना देशमूखीचा हक्‍क मिळावा अशी रचना केली. बाये प्रभू यांच्या निधनानंतर गणेश हे गादीवर बसले; मात्र बाये प्रभूंचा मुलगा रामजी याने बंड करून गणेश आणि भानजी यांना पळवून लावले आणि ते गादीवर बसले. 

भानजी हे मुत्सदी होते. काही दिवसातच ते पुन्हा कुडाळात रामजी यांच्याकडे आले आणि जुळवून घेवू लागले. पुढे रामजी हे रेडी येथे काही कामासाठी गेले असता भानजी यांनी त्यांना ठार केले. 1573 मध्ये हा प्रकार घडला. पुढे भानजी सत्ताधिश झाले. त्यांनी अकरा वर्षे देशमूखी सांभाळली. रामजी यांना दादबा आणि कानबा असे दोन पुत्र आणि गोमजी हा भाऊ होता.

या तिघांनाही भानजी यांचा सुड घ्यायचा होता; पण त्यांना संधी मिळत नव्हती. पुढे काही मंडळी त्यांना येवून मिळाली. यात मांजारडेकर हर सावंत व रवळ सावंत-देसाई यांच्या नावाचा उल्लेख मिळतो. त्यांनी मसुरेत (ता. मालवण) भानजी प्रभू यांना गाठून त्यांना ठार केले. यानंतर 1584 मध्ये गोमजी यांना गादीवर बसवण्यात आले. 

सावंतवाडी संस्थानचे अधीपती सावंत-भोसले घराण्यातील मुळ पुरुष असेलेले मांगसावंत 1500 च्या आधी या प्रांतात आले होते. कुडाळ देशाशी या घराण्याच्या राजकीय संघर्षाला याच गोमजीच्या काळात सुरूवात झाली.

कुडाळदेशस्थ प्रभूंकडे दळवी आडनावाचे सेनापती होते. भानजी यांच्या कारकीर्दीत देव दळवी यांच्याकडे हे सेनापती पद होते. त्या काळात सावंत-भोसले होडावडे येथे राहायचे. प्रभू-देसाई आणि सावंत-भोसले घराण्यात संघर्ष सुरू झाला. ही संधी साधत देव दळवी यांनी मांग सावंत यांच्याशी संधान साधत सत्ता स्थापनेसाठी बंड केले. हे बंड मोडून काढण्यासाठी देशमुखी असलेल्या देसाईंनी विजापुरच्या बादशहाकडून मदत मिळवली. 1580 मध्ये लढाई होवून यात मांग सावंत आणि देव दळवी यांचा मृत्यू झाला. मांग सावंत यांची माठी आजही होडावडेत आहे. या भागाला मांगल्याचा मठ म्हणतात. 

पुढे 1597 मध्ये कुडाळच्या देसाईंचे सेनापती असलेल्या नाग दळवी-होडावडेकर यांनीही बंड पुकारले. गोमजी प्रभू यांनी त्यांना कैद केले. तब्बल आठ वर्षे कैदेत राहिल्यानंतर नाग दळवी हे येथून पळून बारदेश (गोवा) येथे जावून राहिले. गोमजी यांनी आपले पुतणे दादबा व कानबा यांना नाग दळवींना पकडण्यासाठी पाठवले; पण उलट ते दोघेही मारले गेले. यानंतर नाग दळवींचा बंड शांत करण्यासाठी त्यांना वर्षाला साडेचारशे होनांची नेमणूक देण्याचे ठरले; मात्र तरीही बंड काही शांत होईना. अखेर देसाईंनी विजापुरच्या बादशहाकडे मदत मागितली. बादशहाने मुराद खान या सरदाराला मदतीसाठी पाठविले. त्याने 1605 मध्ये नाग दळवी आणि त्यांचा मुलगा भाम दळवी यांना ठार करून बंडाचा मोड केला. 

1606 मध्ये विजापुरच्या बादशहाने कुडाळ प्रांतात शिस्त लावण्यासाठी गोपाळ परशुराम व रामचंद्र पंत यांना पाठवले. त्यांनी त्या प्रांतात वतनदार कुलकर्णी नेमून एक व्यवस्था निर्माण केली. यावेळी गोमजी प्रभू सत्ताधिश होते. त्यांच्या निधनानंतर मुलगा गणेश हा व त्यापाठोपाठ बाबाजी हा गादीवर आला. याच कारकीर्दीत सावंत-भोसले घराण्याच्या उत्कर्षाला पुन्हा सुरूवात झाली; मात्र या दोन घराण्यातील सत्तासंघर्ष चालूच राहिला. हा संघर्ष पुढच्या भागामध्ये मांडला जाईलच. कुडाळदेशस्थ प्रभूंच्या सत्तेचा शेवट सावंत-भोसले घराण्यातील राजे लखमसावंत आणि त्यांचे पुतणे खेमसावंत यांच्या कारकीर्दीत झाला. त्या दोघांनी कुडाळदेशस्थ प्रभूंचा पूर्ण पराभव करून कुडाळ परगण्यावर सत्ता निर्माण केली. 

पुढे या घराण्यातील काही वंशज वडाचा पाट येथे राहिले. यातील गोमजी प्रभू यांनी सावंत-भोसले घराण्याला शह देण्यासाठी विजापूरच्या बादशहाकडे मदत मागितली; मात्र बादशहाने मदत न देता वडाचेपाट येथे खासगी तैनातीत इनाम दिले. गोमजी यांचे सर्वात धाकटे भाऊ गणेश हे रामजी प्रभू यांच्या बंडामुळे पळून गेल्याचा संदर्भ आधी आलाच आहे. ते मालवणात राहिले होते. त्यांनी चुलत भाऊ जोगण प्रभू यांना दत्तक घेतले होते. जोगण प्रभूंना कृष्ण प्रभू नावाचा मुलगा होता. याच कृष्ण प्रभूंनी 1663 मध्ये शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी खूप मोठी मदत केली होती. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: history story konkan sindhudurg