esakal | प्रशासनाच्या हातावर तुरी; होम काॅरंटाईन कुटुंबांचा असाही उपद्व्याप
sakal

बोलून बातमी शोधा

home quarantine people going to maneri to goa

आरोग्य विभागाने लेखी पत्र कोविड समितीला दिल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रशासनाच्या हातावर तुरी; होम काॅरंटाईन कुटुंबांचा असाही उपद्व्याप

sakal_logo
By
प्रभाकर धुरी

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - गोव्यातून मणेरी येथे येऊन होम क्वारंटाईन असलेली तीन कुटुंबे प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पुन्हा गोव्यात राहायला गेल्याने तालुक्‍यात खळबळ माजली आहे. मणेरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी ती राहत असलेल्या घरांना भेट दिली असता ती कुटुंबे गोव्यात गेल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांनी त्याबाबतची माहिती कोरोनासाठी नेमलेल्या ग्राम नियंत्रण समितीला आणि वरिष्ठांना दिली. 

ग्राम नियंत्रण समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधीर नाईक आणि ग्रामस्थ भगवान गवस यांना मणेरी तेलीवाडी येथे होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींच्या पाहणीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तीन कुटुंबे (एकूण 9 सदस्य) आढळून आली नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने लेखी पत्र कोविड समितीला दिल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

गोव्यातील डिचोली, मुरगाव वास्को, दाबोली वास्को, पर्वरी आदी ठिकाणांहून तीन कुटुंबे मणेरी तेलीवाडी येथे आली होती. त्यांतील चौघांना 3 ऑगस्टपासून, तर अन्य 5 जणांना 5 ऑगस्टपासून चौदा दिवसांच्या क्वारंटाईनासाठी आरोग्य विभागाने पाठविले होते. त्यांची भेट घेण्यासाठी सकाळी आरोग्य अधिकारी प्रदीप ठोंबरे, आरोग्य सेविका रुपाली पिंगुळकर आणि आशा स्वयंसेविका गेले असता त्यांना नऊजण होम क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी नसल्याचे आढळून आले. त्यांनी घरात माहिती घेतली असता ते सर्वजण काही दिवसांपूर्वी पुन्हा गोव्याला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ माजली. त्यांनी त्याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. कोविड समितीलाही त्यांच्या नावांसह लेखी माहिती दिली. 

मणेरीप्रकरणी आपल्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. त्या आधारे कारवाईसाठी पोलिसांकडे प्रस्ताव पाठवणार आहे. 
- संजय कर्पे, प्रभारी तहसीलदार, दोडामार्ग. 

कारवाई व्हायलाच हवी 
यापुर्वी होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीला त्याच्या मूळ गावी पाठविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांवर दबाव आणला होता. आता त्या समितीशी संबंधित व्यक्तीचे नातेवाईक कायदा मोडून गोव्यात पसार झाल्याने आता समिती त्यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्‍न मणेरी ग्रामस्थ भगवान गवस यांनी विचारला. इथे होम क्वारंटाईन असल्याचे दाखवून काहीजण गोव्यात सरकारी खात्यात नोकरी करत असल्याने या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील

loading image