सोनावल येथे हत्तींचा धुडगूस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

दोडामार्ग - हेवाळे, विजघर, घाटीवडे, बांबर्डे परिसरात शेती बागायतीचे नुकसान करणाऱ्या हत्तींनी आता आपला मोर्चा सोनावलकडे वळवला आहे. दोन दिवसांपूर्वी एकच हत्ती धुडगूस घालत होता. त्यात आता तीन हत्तींची भर पडली आहे. काल (ता. 22) रात्री चार हत्तींनी सोनावलमधील शेती बागायतीची मोठी हानी केली. तिलारी विजघर परिसरात अनेक वर्षे स्थिरावलेले हत्ती तालुक्‍यातील अन्य गावांतही दहशत माजवण्याची शक्‍यता आहे. 

सोनावलमध्ये सोमवारी (ता. 20) रात्री साडेआठच्या सुमारास एक हत्ती पोचला. घाटीवडे, बांबर्डे परिसरात नुकसान करून त्याने हेवाळेकडे कूच केली होती. तेथून तो सोनावलमध्ये पोचला. सोमवारी मध्यरात्री त्याने अनेक शेतकऱ्यांच्या काजू-कवाथे व भातशेतीचे नुकसान केले. प्रमोद गवस, शिवराम गवस, कृष्णा कदम, विठू पाडलोसकर आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे त्याने नुकसान केले. त्यानंतर बुधवारी रात्री आणखी तीन हत्ती सोनावलमध्ये आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. एकूण चार हत्तींनी तेथील शेती बागायतीचे नुकसान केले. 

ऑक्‍टोबर 2002 मध्ये कर्नाटकातील माणमधून मांगेलीमार्गे हत्तींचा एक कळप मांगेलीत उतरला होता. मांगेली परिसरातील अनेक गावांत नुकसान करून तो पाळये, मोर्ले, सोनावलमध्ये पोचला होता. दिवस मावळताच तो कळप तिलारी-बेळगाव राज्यमार्ग "क्रॉस' करून पाळयेतून मोर्ले, सोनावलमध्ये जायचा. तेथून तो घोटगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे, पाल, पुनर्वसन, उसप, कसईमार्गे गोव्यात पोचला होता. वायंगणतड, वेळपई, खानयाळे परिसरातही त्याची दहशत होती. 

दरम्यान, गोव्यात गेलेल्या हत्तींना गोवा वन विभागाने मागे धाडले व नंतर हत्तींनी आपला मोर्चा कळणे, फोंडये, नेतर्डेमार्गे सावंतवाडी, मालवण, कुडाळ तालुक्‍यांकडे वळवला होता. 

Web Title: Horticultural's loss