
पर्यटन उद्योगामुळे चित्रपटांच्या शूटिंगकरिता रत्नागिरी जिल्ह्याला निर्मात्यांनी पसंती दिली. आता प्री-वेडिंग छायाचित्रीकरणासाठी शहरातील तरुणाईसह फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर यांचे लक्ष रत्नागिरी जिल्ह्याकडे वळले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे अशा शूटसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहेत.
रत्नागिरी - जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याची भुरळ साऱ्यांनाच पडते. चित्रपटांचे चित्रीकरणही होत; मात्र पर्यटनाबरोबर विवाहपूर्व छायाचित्रणासाठी (प्री-वेडिंग शूटिंग) दापोली, गुहागर, रत्नागिरी हे हॉट डेस्टिनेशन ठरू लागले आहेत. यातून स्थानिकांना व्यवसायही मिळत आहे. तसेच पर्यटनासाठी प्री - वेडिंगसाठी येणारी मंडळी व ते करीत असलेला खर्च येथील पर्यटन व्यवसायिकांसाठी उपयोगीच ठरत आहे. प्री - वेड शूटिंगची वाढती क्रेझ, त्यासाठी पोषक असे कोकणी वातावरण यामुळे येथे सांस्कृतिक बदल होत आहेत.
पर्यटन उद्योगामुळे चित्रपटांच्या शूटिंगकरिता रत्नागिरी जिल्ह्याला निर्मात्यांनी पसंती दिली. आता प्री-वेडिंग छायाचित्रीकरणासाठी शहरातील तरुणाईसह फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर यांचे लक्ष रत्नागिरी जिल्ह्याकडे वळले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळे अशा शूटसाठी हॉट डेस्टिनेशन ठरत आहेत.
समुद्रकिनारा, डोंगरातील निसर्गसौंदर्य, पुरातन वास्तू, देवस्थाने, तारांकित हॉटेल अशी स्थाने प्री-वेड शूटसाठी निवडली जातात. त्यामुळे गुहागरमधील समुद्रकिनारा, अंजनवेलचा दीपस्तंभ, एन्रॉनचा परिसर, दाभोळ खाडी, हेदवीतील बामणघळ, हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यावरील समुद्रापर्यंत विस्तारलेला काळा खडक, वेळणेश्वर या ठिकाणांना छायाचित्रणासाठी पसंती मिळत आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्गातून मंत्रीपदी कोणाची लागणार वर्णी ?
चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीलगतची गावे, परशुराम घाट, कुंभार्ली घाट, वाशिष्ठी नदीचा परिसर, गोवळकोट किल्ला, कोकण रेल्वेतून दिसणारी ठिकाणे, रामवरदायिनी, तुरंबव चिपळूण शहरातील विंध्यवासिनी असा मंदिर परिसर, पावसाळ्यात धबधब्यांची ठिकाणे छायाचित्रणासाठी प्राधान्याने घेतली जातात. दापोली तालुक्यात कोळथरे, लाडघर, किल्ला व मच्छीमार बोटी बॅकग्राऊंडला घेऊन चित्रीकरण करता येत असल्याने हर्णै समुद्रकिनारा, हर्णैकडे जाताना घाटातील किल्ला दर्शन पॉईंट, डोंगरमाथ्यावरील केशवराज, आसुदच्या पॉईन्ट हॉटेलमध्ये केलेला आकर्षक पूल, आंजर्लेतील कड्यावरचा गणपती या ठिकाणी छायाचित्रण केले जाते. जयगड व दाभोळमधील फेरीबोटीतील प्रवासाचे चित्रीकरण केले जाते. भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध स्थळांवर छायाचित्रीकरण होते. अशी माहिती पुण्यातील विहान स्टुडिओचे सुनील खेडकर यांनी दिली.
प्री-वेडिंग, बेबी शॉवरचा ट्रेन्ड
फोटोमधून आठवणी जतन करण्याची संस्कृती आपल्याला नवी नाही. ८० च्या दशकात गावागावात काही फोटोग्राफर मोटार, विमान, जंगल, महाल असे पडदे लावायचे. त्या पडद्यावर फोटो काढण्याचा ट्रेंड होता. पर्यटन वाढू लागल्यावर पर्यटनस्थळी तत्काळ फोटो देणारे व्यवसाय सुरू झाले. सिनेमाप्रमाणे एखादा आनंददायी प्रसंग कमी खर्चात चित्रित होतो. त्यामुळे लग्न, मुंज आदी समारंभांचे शुटिंग होऊ लागले. आजच्या तरुणाईने त्यात प्री-वेडिंग, बेबी शॉवर यांची भर घातली आहे.
- संजय शिंदे, चित्रम फोटो स्टुडिओ, चिपळूण
हेही वाचा - सोन पावलांनी आली... दागिने घेऊन गेली...! ; कसे ते जरूर वाचा
ॲड. सारंग चव्हाण म्हणाले, ‘‘आमचे एकत्र कुटुंब असून पुण्यात एकाच बिल्डिंगमध्ये तीन काका, एका आत्याचा फ्लॅट आहे. बदलत्या ट्रेंडमुळे आम्हीही प्री वेडिंगसाठी कोकणलाच पसंती दिली. आमच्या कुटुंबीयांनीही त्याला सहमती दिली. धकाधकीच्या वेळापत्रकामुळे पती-पत्नीमधील रोजचा संवाद संपलाय. तणाव सहन करावा लागतो. अशा जीवनातून दोन विरंगुळ्याचे क्षण मिळतात. ते मनाबरोबरच डिजिटली साठवून ठेवण्याची सोय झाली आहे. या सोयीमुळे १५ वर्षांनंतर आपल्या मुलांसोबत या आठवणी पाहण्याचा वेगळा आनंद मिळेल. हा मुद्दा कुटुंबीयांनाही पटला..’’ कोतळूकच्या (ता. गुहागर) आकांक्षा खांबे म्हणाल्या, ‘‘मला घरातून प्री-वेडसाठी विरोध झाला नाही. नातेवाईकांनी व्हॉटस्ॲपवर फोटो मागवून घेतले. वेगवेगळ्या पोजमधील फोटो पाहून त्यांना आनंद झाला.
आपल्या लेकीच्या प्री वेड शूटला परवानगी देणारे महेश दीक्षित म्हणाले, ‘‘रोहन आणि अनुजाला डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करायची होती. साखरपुड्यानंतर दोघंही मोबाईलवर बोलायची आणि आम्ही दोघं तिच्यासोबत होतो. त्यामुळे नव्या कल्पनांचे स्वागत केले.’’